जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राने पटकावली ३४ पदके

  • By admin
  • February 4, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

हिर शहा, सानवी देशवाल यांना रौप्य

ऋषभ दास, अदिती हेगडे, ज्योती पाटील यांना कांस्य, तर मिश्र मिडले रिलेतही कांस्य

हल्दवानी : महाराष्ट्राच्या जलतरणपटुंनी मंगळवारी अखेरच्या दिवशी पदकांचा षटकार ठोकून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरण स्पर्धेची शानदार यशस्वी सांगता केली. हिर शहा, सानवी देशवाल यांनी आपल्या गटात रौप्यपदक जिंकले. ऋषभ दास, अदिती हेगडे, ज्योती पाटील यांना कांस्य, तर ४ बाय १०० मीटर मिश्र मिडले रिलेतही महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले.

पुरुषांच्या १०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या हिर शहा याने ५१.६१ सेकंद वेळेसह रौप्य, तर ऋषभ दासने ५१.७१ सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने ५०.६५ सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले. या प्रकारातील महिला गटातही कर्नाटकच्या धीनिधी देसिंधू हिने ५७.३४ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकाविले. महाराष्ट्राच्या अदिती हेगडे हिने ५९.४९ सेकंद वेळेसह कांस्य, तर दिल्लीच्या तीतिक्षा रावत हिने ५९.३८ सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले.
महिलांच्या १०० मिटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या सानवी देशवाल हिने १ मिनिट १६.३७ सेकंद वेळेसह रौप्य, तर ज्योती पाटील हिने १ मिनिट १७.३६ सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.

४ बाय १०० मिटर मिश्र मिडले रिले शर्यतीत महाराष्ट्राला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. ऋषभ दास, ज्योती पाटील, मिहिर आंब्रे व अदिती हेगडे या चौकडीने ४ मिनिटे ११.०९ सेकंद वेळेसह महाराष्ट्राला स्पर्धेतील हे अखेरचे पदक जिंकून दिले. या प्रकारात कर्नाटक व तमिळनाडू या संघांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाला गवसणी घातली.

जलतरणपटूंनी तारले

गतवेळी गोव्यात झालेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरण स्पर्धेत एकूण १७ पदके जिंकली होती. यामध्ये ५ सुवर्ण, ९ रौप्य व ३ कांस्य पदकांचा समावेश होता. मात्र, यंदाच्या उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ६ सुवर्ण, १४ रौप्य व १५ कांस्य अशी एकूण ३४ पदकांची लयलूट करीत गतवर्षीच्या तुलनेत कितीतरी सरस कामगिरी केली. गतवेळी महाराष्ट्राने ८० सुवर्ण, ६९ रौप्य आणि ७९ कांस्य अशी एकूण २२८ पदकांची लयलूट करत पदक तक्त्यात अव्वल स्थान पटकाविले होते. यावेळी योगासन मधील निराशाजनक कामगिरीमुळे महाराष्ट्राचे ‘नंबर वन’चे सिंहासन डळमळीत झाले आहे. या घडीला पदक तक्त्यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. यात जलतरणपपटुंनी ६ सुवर्णासह ३४ पदके जिंकून खर्या अर्थाने महाराष्ट्राला तारले आहे, अशी माहिती महाराष्ट्राच्या जलतरण संघाचे व्यवस्थापक अजय पाठक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *