
डेरवण : एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या डेरवण एनर्जीया फुटबॉल स्पर्धेत नर्मदा वॅले संघाने विजेतेपद पटकावले.
१७ वर्षांखालील फक्त मुलींसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण १४ संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेसाठी मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधून तसेच, मुंबई, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमधून संघ सहभागी झाले होते.
लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत मध्य प्रदेशच्या नर्मदा वॅले संघाने वर्चस्व गाजवले. उपांत्य फेरीतील झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात नर्मदा वॅले संघाने स्पोर्ट्स अॅथोरीटी ऑफ गुजरात या संघाचा २-० असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तसेच उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इग्नाईट पुणे व एमएसडीएफ बेळगाव या संघामध्ये पेनल्टी शूट आऊटवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात ४-३ अशा फरकाने गोल करून इग्नाईट पुणे संघाने अंतिम फेरीत आपले नाव कोरले.

तृतीय क्रमांकासाठी घेण्यात आलेल्या एमएसडीएफ बेळगाव विरुद्ध स्पोर्ट्स अॅथोरीटी ऑफ गुजरात यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये स्पोर्ट्स अॅथोरीटी ऑफ गुजरात संघाने २-० ची आघाडी करून विजय मिळविला व तृतीय पारितोषिक जिंकले.
अंतिम लढतीत नर्मदा वॅले मध्यप्रदेश विरुद्ध इग्नाईट पुणे या संघांमध्ये झालेल्या रोमांचकारी लढतीत नर्मदा वॅले संघाने २-० अशा फरकाने विजय साकारत विजेतेपद पटकावले.
विजेत्या संघाला ५० हजार रुपये, उपविजेत्या संघाला ४० हजार रुपये आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या संघाला २५ हजार रुपये रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच इग्नाईट पुणे संघातील केनी जैन ही उत्कृष्ट गोलरक्षक आणि स्पोर्ट्स अॅथोरीटी ऑफ गुजरात संघातील खेळाडू सायल ही ‘गोल्डन बूट’ची मानकरी ठरली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे राज्य पंच प्रमुख धनराज मोरे, क्रीडा संयोजन समितीचे योगेश विचारे, राजेश विचारे, वालावलकर रुग्णालयात शस्त्रक्रिया शिबिरांसाठी आलेल्या ब्रिटिश डॉक्टर्स, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.