
१८ क्रीडा प्रकारांत आठ हजार खेळाडूंचा सहभाग
डेरवण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्ट आयोजित शिवजयंती निमित्त होणाऱ्या अकराव्या डेरवण युथ गेम्सचे १० ते १६ मार्च या कालावधीत भव्य आयोजन करण्यात आले आहे.
डेरवण येथील क्रीडा संकुलात १८ खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम या क्रीडा प्रकारांसह देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो-खो, लंगडी, मल्लखांब, योगा या वैयक्तिक खेळांसह फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला वॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाचीही स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे.
भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील आठ हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदाही विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. १२०० पदके, ११५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीस रूपाने देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन १० मार्च रोजी द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त, ऑलिंपियन स्वप्नील कुसाळे यांच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.
या स्पर्धेत ८ ते १८ वर्षांखालील खेळाडू सह्भागी होणार आहेत. ८ मार्चपर्यंत नोंदणी सुरु राहणार असून ऑनलाईन नोंदणी www.svjctsportsacademy.com या वेबसाईटवर सुरु झाली आहे. स्पर्धेच्या नोंदणीसाठी ९८२२६३९३०६, ८८०५२२८९२२, ९८५०८८३२८३, ९३२५४४९२०१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी केले आहे.