
देहरादून : भारताने २०३० मध्ये १०० वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी अहमदाबाद शहर आघाडीवर असल्याचे वृत्त आहे.
२०३६ च्या ऑलिम्पिकसाठी आधीच दावेदार ठरलेला भारत आता २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकडे लक्ष देत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताने ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी इरादा पत्र सादर केले होते. आता भारताने २०३० मध्ये होणाऱ्या १०० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रकुल क्रीडा महासंघासोबत अनौपचारिक चर्चा सुरू केली आहे.
भारतात पहिल्यांदाच २०१० मध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यात आले होते. २०१० चे राष्ट्रकुल खेळ दिल्ली येथे झाले होते. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबाद आघाडीवर आहे. याशिवाय भुवनेश्वर शहराचाही यादीत समावेश आहे.
गेल्या आठवड्यात, सीजीएफ अध्यक्ष ख्रिस जेनकिन्स आणि मुख्य कार्यकारी केटी सॅडलियर यांनी भारतातील अनेक शहरांना भेट दिली. गांधीनगर, भुवनेश्वर आणि नवी दिल्ली येथील राज्य आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी अहमदाबाद आणि भुवनेश्वरमधील संभाव्य ठिकाणांनाही भेट दिली.
डेहराडून येथे झालेल्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी जेनकिन्स यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष पी टी उषा यांचीही भेट घेतली आणि संभाव्य भारतीय बोली लावण्यावर चर्चा झाली.
या चर्चेदरम्यान जेनकिन्सने एक अंतिम मुदत निश्चित केली. त्यामध्ये अधिकृत बोली व्यक्त करण्यासाठी ३१ मार्च ही शेवटची तारीख आहे.
कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचा हवाला देत म्हटले आहे की, ‘सीजीएफचे अध्यक्ष ख्रिस जेनकिन्स यांना नुकतेच राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भारतात आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगाचा उपयोग भारत, कॉमनवेल्थ गेम्स इंडिया आणि कॉमनवेल्थ गेम्समधील संबंध मजबूत करण्यासाठी करण्यात आला. सीजीएफने अलीकडेच २०३० च्या कॉमनवेल्थ गेम्स आणि त्यानंतरच्या स्पर्धांसाठी रस व्यक्त करण्याचे आवाहन केले होते आणि त्यांच्या भारत भेटीदरम्यान, जेनकिन्स यांनी या प्रक्रियेबद्दल काही अनौपचारिक चर्चा केली.’