
जोहान्सबर्ग : अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानने टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला मागे टाकत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला. रशीद सध्या एसए २० मध्ये खेळत आहे. त्याने सर्वाधिक टी २० विकेट्स घेण्याचा किताब मिळवला आहे.
रशीद खान एसए २० मध्ये एमआय केपटाऊनचे नेतृत्व करत आहे. स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना पार्ल रॉयल्स आणि एमआय केपटाऊन यांच्यात खेळला गेला. त्याच सामन्यात रशीदने पहिली विकेट घेताच ब्राव्होचा विक्रम मोडला. ब्राव्होने त्याच्या टी २० कारकिर्दीत ६३१ विकेट्स घेतल्या आहेत, तर रशीद खानने ६३३ विकेट्स घेतल्या आहेत.
कमी कालावधीत चमत्कार
रशीद खानने ऑक्टोबर २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी २० मध्ये पदार्पण केले. त्यामध्ये त्याने फक्त १ विकेट घेतली होता. आता १० वर्षांपेक्षा कमी कालावधीत तो टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.
गेल्या वर्षी (२०२४) क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या ड्वेन ब्राव्होने फेब्रुवारी २००६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी२० मध्ये पदार्पण केले. ब्राव्होला हा आकडा गाठण्यासाठी सुमारे १८ वर्षे लागली, तर रशीद खानने फक्त १० वर्षांपेक्षा कमी कालावधीत हा मोठा आकडा गाठला.
ब्राव्होने ५८२ टी-२० सामन्यांमध्ये २४.४० च्या सरासरीने ६३१ विकेट्स घेतल्या हे उल्लेखनीय आहे. तर रशीद खानने फक्त ४६१ सामन्यांमध्ये १८.०७ च्या सरासरीने ६३३ विकेट्स घेतल्या. यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा सुनील नारायण आहे, ज्याने आतापर्यंत ५७३ बळी घेतले आहेत. यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर चौथ्या आणि बांगलादेशचा शकिब अल हसन पाचव्या क्रमांकावर आहे.
टी २० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
रशीद खान (अफगाणिस्तान) : ६३३ विकेट
ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज) : ६३१ विकेट
सुनील नारायण (वेस्ट इंडिज) : ५७३ विकेट
इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) : ५३१ विकेट
शकिब अल हसन (बांगलादेश) : ४९२ विकेट.