
गुरप्रताप सिंगने पटकावले कांस्य पदक
देहरादून : महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक तर गुरप्रताप सिंग याने कांस्यपदक जिंकून रोईंग स्पर्धेतील सलामीच्या दिवशी शानदार कामगिरी केली.
नाशिकच्या मृण्मयी हिने सिंगल स्कल प्रकारातील दोन किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिला हे अंतर पार करण्यास ८ मिनिटे ४७.६ सेकंद वेळ लागला. मध्यप्रदेशच्या खुशप्रीत कौर हिने हे अंतर ८ मिनिटे ४०.३ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. मृण्मयी हिने २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कास्यपदक जिंकले होते, तर २०२३ मध्ये तिने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
या स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याची मला खात्री होती. त्यादृष्टीनेच मी नियोजन केले होते. रौप्य पदक मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. कारण दोन वर्षांपूर्वी या क्रीडा स्पर्धेत मला कास्यपदक मिळाले होते. येथील पदक मला भावी कारकीर्दीसाठी निश्चितच उपयोगी पडणार आहे, असे मृण्मयी हिने सांगितले.

पुरुषांच्या सिंगल स्कल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा आर्मी रोईंग सेंटरचा खेळाडू गुरप्रताप सिंग याने दोन किलोमीटरचे अंतर ८ मिनिटे ४ सेकंदात पार केले. सेनादलाचा बलराज पन्वर (७ मिनिटे २६.६ सेकंद) व उत्तराखंडचा नवदीप सिंग (७ मिनिटे ४१.१० सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले. पुण्याचा खेळाडू गुरप्रताप सिंग याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने यापूर्वी सेनादलाकडून भाग घेताना अखिल भारतीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे.