
अवघ्या एका गुणाने हुकले सुवर्ण
देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारातील कंपाउंड राउंड महिलामध्ये अखेरच्या क्षणा पर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या अदिती स्वामी, मधुरा धामणगावकर, प्रीतिका प्रदीप यांच्या संघास रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. प्रतिस्पर्धी पंजाब संघाने अवघ्या एका गुणाच्या फरकाने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.

डेहराडून येथील मुख्य क्रिकेट स्टेडियममध्ये महाराष्ट्र विरुद्ध पंजाब हा अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. हवेच्या वेगात सुवर्णपदकासाठी दोन्ही संघातील तुल्यबळ धनुर्धारी भिडले होते. धनुर्धारींनी मारलेला बाणाचा प्रत्येक वेध आणि त्यास मिळणारा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे सुवर्णपदकाची लढत डोळ्याची पारणे फेडणारी ठरली. अदिती स्वामी ( सातारा ), मधुरा धामणगावकर व प्रितिका प्रदीप ( पिंपरी चिंचवड ) या महिला संघाने सुवर्ण पदकासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र, दोन वेळा मिळालेले ८ गुण महाराष्ट्राला महागात पडले अन् त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
त्याआधी, महाराष्ट्राच्या या महिला संघाने उपांत्यपूर्व सामन्यात उत्तराखंड संघावर २३३-२१४ गुणांनी, तर उपांत्य सामन्यात तेलंगणा संघावर २२९-२२८ गुणांनी मात करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामना पंजाब संघाने २२९-२२८ गुण फरकाने म्हणजेच एका गुणाने बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. कंपाउंड महिला संघाचे संघ मार्गदर्शक म्हणून प्रवीण सावंत यांनी यावेळी काम पाहिले.
सुवर्णपदकासाठी खेळत असलेल्या महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष तथा पथक प्रमुख संजय शेटे, संघ व्यवस्थापक प्रवीण गडदे, संघ मार्गदर्शक प्रवीण सावंत, अमर जाधव, समीर मस्के, कुणाल तावरे आदींसह खेळाडूंची उपस्थिती होती.
‘खरं तर आम्ही जोरदार लढत दिली. अवघ्या एका गुणाने हरलो म्हणजे आज नशीब आमच्या बाजूने नव्हते असेच म्हणावे लागेल. पंजाबच्या महिलांनीही चांगला खेळ केला. त्यामुळे त्यादेखील सुवर्णपदकाच्या हक्कदार होत्या.’
- आदिती स्वामी, महाराष्ट्र.