
ठाणे : ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मास्टर कप टी २० क्रिकेट स्पर्धेत कल्याणच्या संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी संघाने विजय साकारला. देवांश सोनवणे याने उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
राज्यस्तरीय मास्टर कप क्रिकेट टी २० लीग स्पर्धा आंतर क्लब घेण्यात येते. या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी करत असते. ही स्पर्धा १० वर्षांखालील खेळाडूंसाठी असते.
ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील विविध क्रिकेट मैदानात घेण्यात येते. ही स्पर्धा अविनाश कदम यांच्या स्मरणार्थ भरवली जाते. रीजेन्सी अनंतम क्रिकेट क्लब डोंबिवली आणि संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी कल्याण यांच्यात चुरशीचा सामना झाला. संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीच्या अवघ्या ८ वर्षांचा देवांश सोनावणे याने ३.४ षटकात १५ धावा देऊन १० गडी बाद करत सामना गाजवला. साई पाटील याने ६३ चेंडूत नाबाद ५२ धावा फटकावत संघाचा विजय सोपा केला. आद्या बर्डे याने २४ चेंडूत ३२, शौर्य तिवारी याने ३३ धावा काढल्या.
रीजन्सी अनंतम क्रिकेट क्लब डोंबिवली संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १२३ धावांचे लक्ष दिले. संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीचा गोलंदाज देवांश सोनवणे याने ३.५ षटकात केवळ १५ धावा देऊन रीजेन्सी अनंतम क्रिकेट क्लबचे दहा गडी बाद करुन एक नवा विक्रम रचला. हितांश रमागपुरे याने २१ धावा, संजय मराठे याने ३६ धावा, श्लोक बनसोडे याने २१ धावा, कविश कोरके याने १८ तर मयंक याने २२ धावा काढल्या.
देवांश सोनवणे व साई पाटील हे कल्याणच्या संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीत सराव करतात. या शानदार कामगिरीबद्दल प्रशिक्षक संतोष पाठक व परेश हिंदुराव यांनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले. या आंतर क्लब स्पर्धेत जिल्ह्यातील अव्वल ३२ क्लब संघास प्रवेश देण्यात आलेला आहे.