
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे आयोजन
अमरावती : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शारीरिक सुदृढता व क्रीडा प्रशिक्षण विषयावरील बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली.
या परिषदेचे उद्घाटन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. अविनाश असनारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंचावर परिषदेतील प्रथम सत्राचे मुख्य वक्ते ऍडॉप्ट फाऊंडेशनचे संचालक दर्शन वाघ, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ माधुरी चेंडके, प्राचार्य प्रा श्रीनिवास देशपांडे, समन्वयक प्रा उदय मांजरे आणि डॉ लक्ष्मीकांत खंडागळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला या परिषदेचे आयोजक डॉ लक्ष्मीकांत खंडागळे यांनी आपल्या प्रास्ताविकात या परिषदेच्या आयोजना मागची समग्र भूमिका सविस्तरपणे मांडली. या प्रसंगी आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये बोलताना विद्यापीठाचे कुलसचिव प्रा अविनाश असनारे यांनी शारीरिक सुदृढता व क्रीडा प्रशिक्षणाचे सामान्य व्यक्तीच्या त्याचप्रमाणे खेळाडूच्या जीवनात असणारे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. तसेच या विषयावरील चर्चासत्र आणि परिषदांचे आयोजन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कसे महत्त्वाचे आहे यावर देखील मार्गदर्शन केले.
संस्थेच्या सचिव डॉ माधुरी चेंडके यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये एखाद्या खेळाडूसाठी सामान्य शारीरिक सुदृढता देखील किती महत्त्वाची भूमिका निभावत असते याविषयी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्रीनिवास देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये ही परिषद कशा अर्थाने बहुविद्याशाखीय स्वरूपाची आहे याचा उहापोह केला. त्याचप्रमाणे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींशिवाय समाजातील इतर घटकांसाठी सुद्धा शारीरिक सुदृढतेचे महत्त्व अधोरेखित केले.
या परिषदेसाठी संपूर्ण देशभरातून जवळपास ६५ विद्यार्थी आणि अध्यापकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२ सहभागींचे संशोधन सादरीकरण केले. या प्रसंगी महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी, विविध राज्यातून आलेले संशोधक विद्यार्थी, शारीरिक शिक्षण संचालक, शारीरिक शिक्षण अध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष हाटेकर व श्रद्धा द्विवेदी यांनी केले. डॉ अनिता गुप्ता यांनी आभार मानले.