
एमएसएम शारीरिक शिक्षण कॉलेज, देवगिरी कॉलेजला उपविजेतेपद
छत्रपती संभाजीनगर : आंतर महाविद्यालयीन रस्सीखेच स्पर्धेत बीडच्या केएसके कॉलेज संघाने दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. एमएसएम शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि देवगिरी महाविद्यालय या संघांनी उपविजेतेपद पटकावले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत केएसके महाविद्यालय बीड व कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी जिल्हा क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर , सिनेट सदस्य डॉ बाबासाहेब मस्के, आंतरराष्ट्रीय पंच डॉ राहुल वाघमारे (नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्राचार्य डॉ विश्वास कंधारे व प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, डॉ राजेश क्षीरसागर, डॉ भालचंद्र सानप, डॉ माणिक राठोड, हे उपस्थित होते. रस्सीखेच या खेळाची स्पर्धा प्रथमच आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत होत असल्याने चांगली चुरस निर्माण झाली होती. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने घेण्यात आली.
या स्पर्धेत पंच म्हणून प्रा राकेश खैरनार, प्रा गणपत पवार, प्रशांत पांडे, रफी जमादार, विनायक वंजारे, विक्रांत वीर, प्रा लक्ष्मण जाधव यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ भालचंद्र सानप, डॉ राजेंद्र क्षीरसागर, डॉ संतोष वनगुजरे यांनी विशेष प्रयत्न केले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
मुलांचा गट : १. केएसके महाविद्यालय बीड, २. एमएसएम शारीरिक शिक्षण महाविद्यालय, ३. कालिकादेवी कला महाविद्यालय शिरूर कासार, ४. हंबर्डे कला वाणिज्य महाविद्यालय आष्टी.
मुलींचा गट : १. केएसके महाविद्यालय बीड, २. देवगिरी महाविद्यालय, ३. योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई, ४. महिला महाविद्यालय बीड.