
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ११ वर्षांंखालील मुले व मुली व १३ वर्षांखालील मुले व मुली या गटांची जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा ९ फेब्रुवारी रोजी गरवारे कम्युनिटी सेंटर, सिडको एन ७ येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा मुले व मुली अशा स्वतंत्र गटात होणार आहे. या निवड चाचणी स्पर्धेतून ११ व १३ वर्षांखालील मुले व मुली यांचा २-२ खेळाडूंचा संघ निवडण्यात येणार आहे. यातून निवडलेला संघ हा आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत निवड झाली नसल्यास जर सहभागी खेळाडुंना या गटातील राज्य स्पर्धेत सहभाग नोंदवण्याची इच्छा असेल तर अशा होतकरू बुद्धिबळ खेळाडूंना जिल्हा संघटनेतर्फे शिफारशीनुसार राज्य अजिंक्यपद स्पर्धेत डोनर एन्ट्री भरून सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण अशी ईच्छा असणाऱ्या खेळाडूंचा त्या गटातील जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सहभाग असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेतून पुढे राष्ट्रीय व एशियन गेम्स मध्ये सहभागी होण्याचा मार्ग खुला होतो त्यामूळे या संधीचा पुरेपूर वापर करावा व जास्तीत जास्त संख्येने जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटना सचिव हेमेंद्र पटेल व गरवारे कम्युनिटी सेंटर चे संचालक सुनील सुतवणे यांनी केले आहे.
रविवारी (९ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा फिडे नियमांतर्गत स्विस लीग पद्धतीने घेण्यात येईल. विजेत्यांना मेडल दिले जाणार आहेत. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. खेळाडूंनी आपापले चेस सेट व चेस क्लॉक आणून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल यांच्याशी संपर्क साधावा.