चिपळूण : ३८वी राष्ट्रीय मल्लखांब क्रीडा स्पर्धा यंदा ११ फेब्रुवारीपासून उत्तराखंड येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संघातील सहा मुले व मुली यांचे सराव प्रशिक्षण शिबीर डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात सध्या सुरू आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या विद्यमाने महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना, रत्नागिरी जिल्हा मल्लखांब संघटना चिपळूणच्यावतीने हे शिबीर होत असून महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू कसून सराव करीत आहेत. चिपळूण येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते शांताराम जोशी, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तथा बाबू तांबे, रणवीर सावंत, विनायक पवार यांचे या सराव शिबिरासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य लाभत आहे.
उत्तराखंड येथे ११ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात हे सराव शिबीर होत आहे. संघाचे प्रशिक्षक संदीप शिंदे, संघाचे व्यवस्थापक पंकज शिंदे, तसेच महिला प्रशिक्षक साक्षी गर्गे हे बारा खेळाडूंकडून अत्यंत कसून सराव करून घेत आहेत. त्यांना डावपेच शिकवत आहेत. वडाळा येथे दीडशे खेळाडूंमधून या १२ खेळाडूंची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उत्तराखंड येथे थंड हवेचे वातावरण आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनची पातळी कमी आहे. या पार्श्वभूमीवर ते सकाळी पाच ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेत हे प्रशिक्षण घेतले जात आहे. प्रशिक्षणासह टीम बॉण्डिंग, टीम ऍक्टिव्हिटी , त्याचबरोबर स्विमिंग, वर्कआउट, रनिंग, मेडिटेशन याचेही धडे या संघाला दिले जात आहेत. वालावलकर रुग्णालयाच्यावतीने खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होत आहे. त्यांना योग्य तो डाएट दिला जात आहे. त्यामुळे हे खेळाडू या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मोठे यश मिळवतील, असा विश्वास या संघाचे प्रशिक्षक संदीप शिंदे व पंकज शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
एसव्हीजेसीटीचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांचे यासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले आहे. संकुलातील विनायक पवार प्रतीक्षा पेंढारी अविनाश पवार सागर साळवी यांनीही हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. डेरवण रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला, थेरपीस्ट मसाज, असं सारं काही या खेळाडूंना दिले जात आहे.
महाराष्ट्राच्या संघामध्ये दोन खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे, तर अनेकजण यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेले आहेत. त्यामुळे या वेळीही उत्तम यश या स्पर्धेत मिळेल, असा विश्वास महिला पंच साक्षी गर्गे यांनी व्यक्त केला आहे. पुरलेला मल्लखांब, रोप मल्लखांब, लटकलेला मल्लखांब अशा प्रकारात हे खेळाडू आपले कौशल्य दाखविणार आहेत. या संघामध्ये जान्हवी जाधव (मुंबई उपनगर) ही आंतरराष्ट्रीय खेळाडू असून तिने जागतिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे. तिला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. नेहा क्षीरसागर ही साताऱ्याची राष्ट्रीय खेळाडू आहे. आदित्य पाटील हा मुंबईचा राष्ट्रीय खेळाडू आहे. रूपाली गंगावणे ही मुंबई उपनगरची इंटरनॅशनल खेळाडू असून तिलाही शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर सोहेल शेख (मुंबई उपनगर), दर्शन मणियार (सातारा), वृषभ घुबडे (मुंबई उपनगर), शार्दुल ऋषिकेश (मुंबई उपनगर), मृगांक पाठारे (मुंबई उपनगर), पल्लवी शिंदे (सातारा), प्रणाली मोरे (सातारा), निधी राणे (मुंबई उपनगर) यांचा या संघामध्ये समावेश आहे.
प्रशिक्षक संदीप शिंदे हे नॅशनल खेळाडू असून इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब म्हणून पुणे येथे अॅकॅडमी चालवितात. तसेच साक्षी गर्ने या नॅशनल खेळाडू असून त्या इंटरनॅशनल रेफ्री देखील आहेत. व्यवस्थापक पंकज शिंदे हेही शिवछत्रपती पुरस्कार विजेते असून पुणे येथे वेदांत अकॅडमी चालवितात. सर्व खेळाडूंनीही आम्ही या राष्ट्रीय स्पर्धेत मोठे यश मिळवू, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर इथले वातावरण खूप चांगले आहे. रत्नागिरी जिल्हा असोसिएशनने आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्याचबरोबर डेरवण येथील क्रीडा संकुलाचेही सहकार्य चांगले लाभले आहे, असे सांगितले.