ठाणे सुपर्ब, नाशिक मास्टर्स, थुंगा हॉस्पिटल्स, छत्रपती किंग्ज, आयकॉन हॉस्पिटल्स, एससीबी नाशिक विजयी 

  • By admin
  • February 6, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

संभाजीनगर नॅशनल डीपीएल लीग स्पर्धेला शानदार प्रारंभ 

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर नॅशनल डीपीएल सिझन ९ स्पर्धेला गुरुवारी शानदार सुरुवात झाली. पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये ठाणे सुपर्ब, नाशिक मास्टर्स, थुंगा हॉस्पिटल्स, छत्रपती किंग्ज, आयकॉन हॉस्पिटल्स आणि एससीबी नाशिक या संघांनी विजय साकारत स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली. या सामन्यांमध्ये डॉ विनय सांगळे, भूषण नेमाडे, कृणाल ठक्कर, डॉ मयूर जे, डॉ अमर मते, डॉ आशिष पुरी यांनी सामनावीर किताब पटकावला. 

ही स्पर्धा शहरातील तीन क्रिकेट मैदानांवर घेण्यात येत आहे. ठाणे सुपर्ब संघाने हैदराबाद स्टॅलियन्स संघावर सहा विकेट राखून विजय साकारला. हैदराबाद संघाने २० षटकात सर्वबा १३३ धावा काढल्या होत्या. ठाणे सुपर्ब संघाने १४.३ षटकात चार बाद १३५ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला. या लढतीत कन्नैया (२९), पवन बडे (२८) व ह्रषिकेश चव्हाण (२५) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत डॉ विनय सांगळे (३-२०), डॉ वरुण म्हात्रे (२-११) व डॉ सुनील पाटील (२-८) यांनी सुरेख स्पेल टाकत विकेट घेतल्या. 

नाशिक मास्टर्स संघाने चुरशीच्या लढतीत केम मार्डरर्स संघावर १० धावांनी विजय नोंदवला. नाशिक मास्टर्स संघाने २० षटकात नऊ बाद १३४ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात केम मार्डरर्स संघ २० षटकात नऊ बाद १२४ धावा काढू शकला. नाशिक मास्टर्स संघाने १० धावांनी विजय साकारत आगेकूच केली. या सामन्यात डॉ शेखर यादव (४३), भूषण नेमाडे (४२), रोहन मेटकरी (३१) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत गौतम (३-२२), सचिन पाटील (२-१७) व अमित सिंग (२-२२) यांनी प्रभावी गोलंदाजी करत विकेट घेतल्या.

थुंगा हॉस्पिटल्स संघाने चंद्रा रुग्णालय संघावर दोन विकेट राखून मात केली. चंद्रा रुग्णालय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊ बाद १८५ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना थुंगा हॉस्पिटल्स संघाने २० षटकात आठ बाद १८६ धावा फटकावत दोन विकेटने सामना जिंकला. या सामन्यात सिद्धार्थ कटारिया (४७), कृणाल ठक्कर (४६) व मेहबूब शेख (४१) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत अमित पाल (३-१५), शाहिद सय्यद (२-३५) व नरेंद्र भुमकर (१-२६) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

छत्रपती किंग्ज संघाने आयएमए अमरावती संघावर ३१ धावांनी विजय नोंदवला. छत्रपती किंग्ज संघाने २० षटकात सहा बाद १८७ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावंसख्येचा पाठलाग करताना आयएमए अमरावती संघ २० षटकात सात बाद १५६ धावा काढू शकला. छत्रपती किंग्ज संघाने ३१ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात प्रशांत वांडेशकर (६६), रशीद रियाझ (४०), राजेंद्र चोपडा (३५) यांनी धमाकेदार फलंदाजी करत मैदान गाजवले. गोलंदाजीत राजेश चौधरी (२-२७), डॉ रवी महाजन (२-४४) व सोहेल बारी (२-३३) यांनी प्रभावी मारा करत प्रत्येकी दोन गडी बाद केले.

आयकॉन  हॉस्पिटल्स संघाने हैदराबाद स्पार्टन्स संघाचा रोमांचक सामन्यात १० धावांनी पराभव केला. आयकॉन हॉस्पिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊ बाद १४५ धावा काढल्या. हैदराबाद स्पार्टन्स संघाला १९.४ षटकात सर्वबाद १३५ धावांवर रोखत आयकॉन संघाने १० धावांनी सामना जिंकला. या सामन्यात साई महेश (३६), डॉ आसिफ बियाबानी (३१) व मशुदुल सय्यद (२०) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत डॉ अमर मते (३-१४), डॉ सनी मार्शल (३-२९) व साई महेश (२-१७) यांनी अप्रतिम गोलंदाजी करत विकेट घेतल्या.

एससीबी नाशिक संघाने शिवशक्ती योद्धा संघाचा तब्बल १३२ धावांनी पराभव केला. एससीबी नाशिक संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात चार बाद १८१ धावसंख्या उभारली. शिवशक्ती योद्धा संघ १२ षटकात अवघ्या ४९ धावांत सर्वबाद झाला. नाशिक संघाने १३२ धावांनी मोठा विजय साकारला. या सामन्यात डॉ आशिष पुरी (९१), डॉ अमोल भिसे (३९) व डॉ पंकज वाल्हेकर (१७) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. गोलंदाजीत डॉ दीपेश (३-१३), डॉ सचिन भाबड (२-८) व मनोज ताजी (२-२४) यांनी प्रभावी स्पेल टाकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *