
‘मॅच फिक्सिंग’चे आरोप खोटे असल्याचे न्यायालयाने फटकारले; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
हल्दवानी : उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो खेळाच्या स्पर्धा संचालकांना ‘मॅच फिक्सिंग’ चे खोटे आरोप करून जीटीसीसीने पदावरून हटवले होते. याविरोधात तायक्वांदो फेडरेशन ऑफ इडियाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली व दिल्ली उच्च न्यायालयात कुठलाही पुरावा देता न आल्याने उच्च न्यायालयाने स्पर्धेचे संपूर्ण अधिकार तायक्वांदो स्पर्धा संचालकांना व ‘टीएफआय‘ला पुन्हा बहाल करण्याचा निर्णय दिला आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान तायक्वांदो स्पर्धा सुरू होण्याच्या पुर्व संध्येला तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे स्पर्धा संचालक प्रवीणकुमार यांच्यावर ‘मॅच फिक्सिंग’चे खोटे आरोप करून त्यांना या पदावरून हटवण्यात आल्याच्या बातम्यांमुळे खळबळ माजली होती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या गुरुवारी आलेल्या या निर्णयामुळे तायक्वांदो खेळाला बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तांत्रिक समिती (जीटीसीसी) यांनी आरोप असलेल्या टी प्रवीणकुमार यांना तत्काळ हटवून एस दिनेशकुमार यांची नियुक्ती केली होती.
या विरोधात तायक्वांदो फेडरेशन ऑफ इडियाने (टीएफआय) दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती. यावर न्यायालयाने सुनावणी करत स्पर्धेचे संपूर्ण अधिकार तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उतराखंड २२५ तायक्वांदो स्पर्धा संचालकांना पुन्हा बहाल केले आहेत, तसेच ‘टीएफआय’ला अधिकृत राष्ट्रीय फेडरेशन (एन एस एफ) म्हणून स्पर्धा आयोजनाची संपूर्ण जबाबदारी बहाल केली आहे. त्यामुळे तायक्वांदो खेळाला ‘मॅच फिक्सिंग’ सारखे शब्द वापरून खेळाला बदनाम करणाऱ्यांनी कुठल्याही पुराव्याशिवाय केलेले आरोप उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. ‘टीएफआय’कडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या व ‘जीटीसीसी’कडून या खोट्या आरोपांमुळे स्पर्धेतील नियुक्ती रद्द करण्यात आलेल्या २० ऑफिशियल, पंचांनाही पुन्हा नियुक्ती बहाल करण्यात आलेली आहे.
अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या काही पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन वृत्त पत्रांमध्ये ‘मॅच फिक्सिंग’ सारखे खोटे आरोप करून तायक्वांदो खेळाची व फेडरेशनची प्रतिमा मलिन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या विरोधात न्यालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.
तायक्वांदो खेळांमध्ये ‘मॅच फिक्सींग’ सारखे खोटे आरोप करून तायक्वांदो खेळाला बदनाम करणाऱ्यांना उच्च न्यायालयाची ही मोठी चपराक आहे असे मत तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव अॅड आर डी मंगुयेशकर यांनी व्यक्त केले.
तायक्वांदो खेळ ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असून हा खेळ ‘सेन्सर’वर खेळला जातो. यासह सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संपूर्ण संगणक प्रणालीचा, अत्याधुनिक सेंसरचा वापर केला जात असल्याने स्पर्धेमध्ये कोणालाही मानवी हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे हा खेळ १०० टक्के संपूर्ण पारदर्शक आहे. तसेच, तज्ञ प्रशिक्षकांसह खेळाडूंनाही स्वतःचे गुणांकन सामना सुरू असताना संगणक प्रणालीद्वारे मोठ्या पडद्यावर पाहता येते. प्रत्येक प्रशिक्षकालाही आपल्या खेळाडूच्या गुणांबद्दल काही आक्षेप असल्यास त्यांना तात्काळ दादही मागता येते. त्यामुळे या खेळात कधीच फिक्सिंग सारखे प्रकार होऊ शकत नाहीत, असे मत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांनी व्यक्त केले आहे.