
शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेलची धमाकेदार फलंदाजी; हर्षित राणा, रवींद्र जडेजाची अप्रतिम गोलंदाजी
नागपूर : उपकर्णधार शुभमन गिल (८७), श्रेयस अय्यर (५९) आणि अक्षर पटेल (५२) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडचा ३८.४ षटकात सहा बाद २५१ धावा फटकावत चार विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टी २० मालिकेनंतरही इंग्लंडची पराभवाची मालिका पुढे चालू राहिली.
भारतीय संघासमोर विजयासाठी २४९ धावांचे आव्हान होते. कर्णधार रोहित शर्मा (२) पुन्हा एकदा अपयशी ठरला. रोहित केवळ ७ चेंडू खेळू शकला. यशस्वी जैस्वाल तीन चौकारांसह १५ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर याने ३६ चेंडूत ५९ धावांची तुफानी खेळी करत डावाला आकार दिला. अय्यरने दोन उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले. अय्यर बाद झाला तेव्हा भारताची स्थिती तीन बाद ११३ अशी होती.
तीन बाद ११३ धावसंख्येवर अक्षर पटेल मैदानात उतरला. शुभमन गिल आणि अक्षर पटेल या जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन संघाचा विजय निश्चित केला. उपकर्णधार पदाची जबाबदारी आल्यानंतर पहिल्याच डावात शुभमन गिल याने धमाकेदार अर्धशतक ठोकले. अक्षर पटेल याने त्याला सुरेख साथ देत १०८ धावांची भागीदारी रचली. पटेल ४७ चेंडूत ५२ धावा काढून बाद झाला. त्याने एक षटकार व सहा चौकार मारले. आदिल रशीद याने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड केले तेव्हा भारताला विजयासाठी २८ धावांची गरज होती. केएल राहुल (२) यालाही आदिलने स्वस्तात बाद केले. हार्दिक याने आदिलला षटकार ठोकत खाते उघडले.
विजयासाठी १४ धावांची गरज असताना शुभमन गिलची धमाकेदार ८७ धावांची खेळी संपुष्टात आली. शुभमनने ९६ चेंडूंचा सामना करताना १४ बहारदार चौकार ठोकले. शतक ठोकण्याच्या प्रयत्नात गिलने उंच फटका मारत आपली विकेट गमावली. रवींद्र जडेजा (नाबाद १२) आणि हार्दिक पांड्या (नाबाद ९) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने पहिला एकदिवसीय सामना चार विकेट राखून जिंकला. इंग्लंडकडून आदिल रशीद (२-४९) व साकिब महमूद (२-४७) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
इंग्लंडला २४८ धावांवर रोखले
पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला ४७.४ षटकांत २४८ धावांत गुंडाळले. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतकं झळकावली. त्यामुळे इंग्लंड संघ आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला. भारताकडून हर्षित आणि जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या, तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फिल साल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. सॉल्ट धावबाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव डळमळीत झाला आणि हर्षितने भारतीय संघाला परत आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्यानंतर बटलरने समजूतदार फलंदाजी केली आणि इंग्लंडची जबाबदारी घेतली. परंतु तो बाद झाल्यानंतर इंग्लंड संघ पुन्हा डळमळीत झाला. तथापि, बेथेलने धीर धरला आणि अर्धशतक ठोकले. पण बेथेल बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाज काही खास करू शकले नाहीत आणि इंग्लंड संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही.
इंग्लंडकडून बटलरने ५२ धावा, बेथेलने ५१ धावा, सॉल्टने ४३ धावा आणि डकेटने ३२ धावा केल्या, परंतु इतर फलंदाज काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत.