
बारामती : राज्यस्तरीय कारभारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पुनीत बालन पुणे संघाने अंतिम सामन्यात म्यावरिक पुणे संघाचा ९७ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.
बारामतीच्या कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब स्टेडियम बारामती येथे कारभारी प्रीमियर लीग राज्यस्तरीय लेदर बॉल स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचा अंतिम सामना म्यावरिक पुणे आणि पुनीत बालन ग्रुप पुणे या दोन बलाढ्य संघात झाला. या प्रसंगी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, सुयश बुरकुल असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
अंतिम सामन्यात हर्ष संघवी (४१), ओंकार खाटपे (४०) ,सिद्धार्थ म्हात्रे (२९) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पुनीत बालन ग्रुप पुणे संघाने २०१ असा धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात यश खळदकर याने ५ गडी बाद करीत म्यावरिक संघाला खिंडार पाडले. यशच्या भन्नाट कामगिरीने पुनीत बालन संघाने मोठा विजय साकारत विजेतेपद पटकावले. नौशाद शेख (२६) आणि ऋषिकेश सोनावणे (३५) यांनी दिलेली झुंज अपुरी ठरली.
कारभारी प्रीमियर लीगचा बक्षीस वितरण सोहळा केदार जाधव, सुयश बुरकुल, संस्थेचे अध्यक्ष हनुमंत अप्पा मोहिते, संचालिका संध्या जाधव, प्रिया मोहिते, संतोष ढवान, वीरसिंग सातव तसेच स्पर्धेचे चेअरमन प्रशांत नाना सातव यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पृथ्वीराज सातव, शिवानी सातव, दशरथ जाधव, योगेश डहाळे, साक्षी ढवान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे समालोचन नरेश ढोमे, ज्ञानेश्वर जगताप, दत्ता पवार यांनी केले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
फलंदाज : ओंकार खाटपे
गोलंदाज : सुमित मरकळी
क्षेत्ररक्षक : हर्ष मोगविरा
यष्टीरक्षक : वेदांत देवाडे, अनिकेत पठारे
मालिकावीर : यश खळदकर.
संक्षिप्त धावफलक : पुनीत बालन पुणे : २० षटकात सर्वबाद २०१ (हर्ष संघवी ४१, ओंकार खाटपे ४०, सिद्धार्थ म्हात्रे २९, ऋषभ राठोड २०, सागर होगडे ३-४०, हरी सावंत ३-३९, सचिन राठोड २-४२) विजयी विरुद्ध म्यावरिक पुणे : १४.३ षटकात सर्वबाद १०४ (ऋषिकेश सोनवणे ३५, नौशाद शेख २६, सुमित मरकळी २-२१, सिद्धार्थ म्हात्रे २-२०, यश खळदकर ५-१०).