
नागपूर : ‘मी एक चित्रपट पाहात होतो. त्याचवेळी कर्णधार रोहितचा फोन आला आणि त्याने मला सांगितले की मी खेळू शकतो. कारण विराटच्या गुडघ्यात सूज आहे. मी मी पटकन माझ्या खोलीत गेलो आणि झोपलो अशा शब्दांत पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३६ चेंडूत ५९ धावांची खेळी करत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचणाऱ्या श्रेयस अय्यर याने सांगितले.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावून भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला श्रेयस अय्यर या सामन्यात खेळणार नव्हता. त्याने स्वतः हे उघड केले. सामन्यानंतर श्रेयस अय्यर याने सांगितले की बुधवारी रात्री त्याला कर्णधार रोहित शर्माचा फोन आला होता. खरे तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या उजव्या गुडघ्यात सूज आल्यामुळे या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी श्रेयस अय्यरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला. कर्णधार रोहित शर्माचा निर्णय योग्य ठरला आणि श्रेयस अय्यर याने फक्त ३६ चेंडूत ५९ धावा करत विजयाचा पाया रचला.
रोहितचा फोन आला
सामन्यानंतर प्रसारकांशी बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘रात्री उशिरा कर्णधार रोहित शर्माने त्याला फोन केला तेव्हा त्याला नागपूरमध्ये खेळण्याबद्दल कळले. अय्यर म्हणाला की, ‘किती हास्यास्पद गोष्ट आहे. काल रात्री मी एक चित्रपट पाहत होतो, मला वाटले की मी जास्त वेळ जागे राहू शकतो. पण नंतर मला कर्णधाराचा फोन आला आणि त्याने मला सांगितले की मी उद्या खेळू शकतो. कारण विराटच्या गुडघ्यात सूज आहे आणि मग मी पटकन माझ्या खोलीत गेलो आणि झोपलो.’
या दरम्यान श्रेयस अय्यरने यशस्वी जैस्वालला त्याच्यापेक्षा प्राधान्य देण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले. अय्यर म्हणाला की, ‘मला माहित आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे पण मला आत्ताच विजय साजरा करायचा आहे. जैस्वालचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केल्यामुळे भारताला त्यांच्या फलंदाजीच्या क्रमात बदल करावा लागला हे ज्ञात आहे. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर आला. तथापि, जर विराट कोहली प्लेइंग ११ चा भाग असता तर भारताचा फलंदाजीचा क्रम कसा असता हे सांगणे कठीण आहे.
दुसरे सर्वात जलद अर्धशतक
या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खास झाली नाही. १९ धावांच्या धावसंख्येवर संघाला दोन धक्के बसले. यशस्वी जैस्वाल १५ धावा काढून बाद झाला आणि रोहित शर्मा दोन धावा काढून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ६४ चेंडूत ९४ धावांची भागीदारी झाली. श्रेयस अय्यर याने तुफानी अर्धशतकी खेळी केली. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १९ वे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ३० चेंडू घेतले. या फॉरमॅटमध्ये हे त्याचे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. यापूर्वी २०१९ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध २८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.