
पिथोरगड : बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या हरिवंश तिवारी याने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. महाराष्ट्राच्या इतर खेळाडूंचा उपांत्य फेरीपूर्वीच पराभव झाल्याने मुष्टीयुद्धातील महाराष्ट्राचे हे एकमेव पदक ठरले आहे.
६० ते ६३.५ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत ऑलिम्पिकमध्ये तीन वेळा प्रतिनिधित्व करणार्या शिवा थापा याला महाराष्ट्राच्या हरिवंश तिवारीने शेवटपर्यंत जिद्दीने लढत दिली. हरिवंशला उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक स्तरावर अनेक पदके जिंकणारा शिवा या खेळाडूचे ६० किलो वजनी गटात सुवर्णपदक निश्चित मानले जात होते .त्यामुळेच त्याच्याविरुद्ध खेळताना हरिवंश याला फारशी संधी नव्हती. तरीही हरिवंश याने तीनही फेर्यांमध्ये शिवा याला कौतुकास्पद झुंज दिली. हरिवंश याने ही लढत गमावली तरीही प्रेक्षकांनी त्याच्या जिद्दीचे मनापासून कौतुक केले.
अकोला येथील खेळाडू हरिवंश याचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. त्याने यापूर्वी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत तीन वेळा कांस्यपदक तर अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत एक कांस्यपदक जिंकले होते. २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. २०२१-२२ चा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला आहे. हरिवंश हा सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.