
छत्रपती संभाजीनगर : श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था व अॅडव्होकेट स्पोर्ट्स कल्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावर उत्साहात करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड दिनेश वकील तर विशेष अतिथी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे, प्रसिद्ध उद्योजक नवीन बगडिया, गरवारे कम्युनिटी सेंटरचे डॉ सुनील सुतवणे, ॲड गोपाल पांडे, ॲड संकर्षण जोशी, ॲड गणेश अनसिंगेकर, ॲड छाबडा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना उद्योजक नवीन बगडिया यांनी खेळाडूंनी यश प्राप्त करण्यासाठी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम व सराव करणे अपेक्षित आहेत. नेहमीच सरावानेच निश्चित यश प्राप्ती होते असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
प्रभारी कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक केले. तसेच यापुढे विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मैदान नेहमीच उपलब्ध करून देऊ व संस्थेच्या अशा चांगल्या उपक्रमासाठी विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल असे मनोगत व्यक्त केले.
डॉ सुनील सुतवणे यांनी गरवारे कम्युनिटी सेंटर हे नेहमीच अशा चांगल्या उपक्रमांच्या आयोजनासाठी सहकार्य करते. विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम व सूर्यनमस्कार घालावे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड गोपाल पांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड संकर्षण जोशी यांनी केले. बक्षीस वाचन चंद्रशेखर पाटील यांनी केले. संजय कंटोले यांनी आभार मानले.
या प्रसंगी डॉ गजानन सानप, डॉ विशाल देशपांडे, डॉ दयानंद कांबळे, डॉ पूनम राठोड, सतीश पाठक, उदय पंड्या, दीपक सपकाळ आदी उपस्थित होते.