तिरंदाजीत महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण विजेतेपद

  • By admin
  • February 7, 2025
  • 0
  • 94 Views
Spread the love

इंडियन राऊंडमध्ये महाराष्ट्राला एक सुवर्ण, एक कांस्य

देहरादून : सात दिवस चाललेल्या तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशा एकूण ५ पदकांची लयलूट करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.

इंडियन राऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या संघाने ओडिशाचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. त्यानंतर गौरव चांदणे व भावना सत्यगिरी या महाराष्ट्राच्या जोडीने इंडियन राऊंडच्या मिश्र दुहेरीत बाजी मारत सुवर्ण पदकाने तिरंदाजी स्पर्धेचा गोड शेवट केला.

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडली. गौरव चांदणे (अमरावती) व भावना सत्यगिरी (पुणे) या जोडीने झारखंडच्या जोडीचा ६-२ (३६-३४, ३७-३४, ३३-३५, ३४-३३) असा पराभव करीत महाराष्ट्राला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले. महाराष्ट्राने हे सोनेरी यश संपादन केले. १६ वर्षीय भावना सत्याजित ही रणजित चामले यांची शिष्या असून, ती आर्चर्स अकॅडमी, पुणे येथे सराव करते. अमर जाधव, समीर मस्के, कुणाल तावरे व प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या तिरंदाजी संघाने हे सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले.पथक प्रमुख संजय शेटे, उपपथक प्रमुख स्मिता शिरोळे, सुनील पूर्णपात्रे यांनी अभिनंदन केले आहे.

कांस्यपदकाच्या एकतर्फी लढतीत बाजी
महाराष्ट्राच्या गौरव चांदणे, रोशन सोळंके, अनिकेत गावडे व पवन जाधव या संघाने तिरंदाजी इंडियन राऊंड प्रकारात कांस्यपदकाची कमाई करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याच्या पदकसंख्येत भर घातली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने कांस्यपदकाच्या लढतीत ओडिशा संघाचा ६-० (४८-४५, ५७-४७, ५५-५१) असा धुव्वा उडविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *