तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राला सात पदके

  • By admin
  • February 7, 2025
  • 0
  • 41 Views
Spread the love

मिश्र दुहेरी सुवर्णासह २ रौप्य आणि ४ कांस्य

हल्दवानी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने तायक्वांदो स्पर्धेत मिश्र दुहेरी सुवर्ण पदकासह २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई करीत दिवस गाजविला. वंश ठाकुर व मृणाली हर्नेकर जोडीने सुवर्ण पदकाला गवसणी घातली, स्पर्धेत दोघांचे सलग दुसरे पदक आहे. वैयक्तिक प्रकारात मृणालीने रौप्य, तर वंश पदक जिंकले आहे.

मानसखंड क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत शिवानी भिलारेने रौप्य, तर साक्षी पाटील, अभिजीत खोपडे, वसुंधरा छेडे यांनीही कांस्य पदकांची लयलूट केली. मिश्र पूमसे प्रकारात वंश ठाकूर सोबत मृणाली हर्नेकर हिने अरुणाचल प्रदेशच्या जोडीवर रोमहर्षक मात केली. महाराष्ट्राने ८.२३३ गुणांची मजल घेत सुवर्णपदकावर नाव कोरले. वैयक्तिक पूमसे प्रकारात मृणाली हर्नेकरने रूपेरी यश संपादन केले. अरुणाचल प्रदेश विरूद्ध महाराष्ट्राची लढत ८.२३२ गुणांवर बरोबरीत झाली. मात्र अरुणाचलने प्रभावी प्रदर्शन केल्याने पाईंंट १ गुणांनी महाराष्ट्राचा निसटता पराभव झाला.

५७ किलो गटातील उत्तराखंडच्या पूजा कुमारी या स्थानिक खेळाडूला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळत होता. तरीही महाराष्ट्राच्या शिवानी भिलारे हिने शेवटपर्यंत कौतुकास्पद लढत दिली. अखेर शिवानी हिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. शिवानी व पूजा यांच्यातील ५७ किलो गटाची लढत अतिशय रंगतदार झाली. दोन्ही खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावून ही लढत खेळली. त्यामुळे शेवटपर्यंत त्यामध्ये उत्सुकता राहिली होती. त्यातही या लढतीच्या पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत पूजा हिला स्थानिक प्रेक्षकांकडून सतत प्रोत्साहन मिळाले. तरीही शिवानी हिने जिद्दीने झुंज दिली.अखेर पूजा हिला सुवर्णपदक तर शिवानीला रौप्यपदक मिळाले.

वजनी गटात साक्षी पाटील (४८ किलो ) व अभिजीत खोपडे (५४ किलो) तर वैयक्तिक पूमसे प्रकारात वंश ठाकूर व वसुंधरा छेडे या चौघांनीही उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठताना सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर त्यांना कांस्यपदक बहाल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *