
देहरादून : आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळे, किमया कार्ले यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक संघासाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारपासून पदकांचा खजिना उघडणारा असून, नेहमीप्रमाणेच यंदाही भरघोस पदके जिंकण्याची संधी आहे.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर असलेल्या भागीरथी संकुलात जिम्नॅस्टिक्सच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये शनिवारी प्राथमिक फेरीस प्रारंभ होत आहे. त्यामध्ये रिदमिक, ट्रॅम्पोलिन, एरोबिक्स, आर्टिस्टिक या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
रिदमिक या क्रीडा प्रकारात संयुक्त व किमया या अनुभवी खेळाडूंबरोबरच परिणा मदनपोत्रा व शुभश्री मोरे या नवोदित खेळाडूंकडूनही महाराष्ट्राला पदकाच्या आशा आहेत. ट्रॅम्पोलिन या क्रीडा प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू राही पाखळे हिच्याकडून वैयक्तिक विभागात पदकाची आशा असून, सांघिक विभागातही महाराष्ट्राला पदक मिळेल असा अंदाज आहे.
एरोबिक्समध्ये आर्य शहा हा पदकाचा मुख्य दावेदार मानला जात असून, आर्टिस्टिकमध्ये ओंकार शिंदे व सिद्धांत कोंडे यांच्यावर महाराष्ट्राची मदार आहे.