
सातारा : एकविध क्रीडा संघटना, क्रीडा संस्था आणि क्लब यांनी माहिती सादर करावी असे आवाहन सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.
खेळाचा प्रसार-प्रचार करण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध खेळांच्या संघटना, क्रीडा संस्था, क्लब स्थापन करण्यात आलेले आहेत. सदर संघटनांच्या माध्यमातून सदर खेळांच्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तसेच एकविध क्रीडा संघटना, क्रीडा संस्था, क्लब यांच्यामार्फत विविध प्रशिक्षण केंद्रांतर्गत खेळाडूंचे प्रशिक्षण सुरू असते. सदर प्रशिक्षण केंद्रांतर्गत खेळाडूंचे अद्ययावत व तंत्रशुद्ध सराव घेण्यात येतो.
सातारा जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटना, क्रीडा संस्था व क्लब यांनी नोंदणी प्रमाणपत्र, घटना, उद्दिष्टे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे संलग्नता पत्र, जिल्ह्याच्या अध्यक्ष व सचिव यांची नावे, संपर्क क्रमांक, लेखा परीक्षण अहवाल, प्रशिक्षण केंद्राचा तपशिल, ठिकाण, प्रशिक्षकाचे नाव, खेळाडू संख्या, एकविध क्रीडा संघटना संलग्न क्लब, संस्था यादी, विविध संस्थांमार्फत चालवण्यात येणारे प्रशिक्षण केंद्र आदी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे १५ फेब्रुवारीपर्यंत समक्ष अथवा sataradso@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.