
उद्योजक अनिल जोगळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन
पुणे : ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड, मुंबई, इंडिया आणि दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे उपाध्यक्ष उद्योजक अनिल जोगळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या हेतूने दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय तिरंगी टी २० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत विज्डम स्पोर्ट्स ग्राउंड, लोहगाव येथे रंगणार आहे.
उद्योजक अनिल जोगळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जोगळेकर यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा खर्च टाळून दिव्यांग खेळाडूंची जिल्हास्तरीय तिरंगी लेदर बॉल वरील टी २० क्रिकेट स्पर्धा पुण्यामध्ये आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये पुणे, सांगली आणि अहिल्यानगर येथील दिव्यांग खेळाडूंचे संघ सहभागी होत आहेत.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी मिलिंद गुंजाळ, ब्रिजेश सोलकर, श्रीकांत काटे, उद्योजक शरद सावंत आणि उद्योजक गणेश खांदवे हे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण स्पर्धेचे नियोजन हे माजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू आणि संस्थेचे सचिव राजू मुजावर यांनी केले आहे. या स्पर्धेमध्ये पुणे संघाचे नेतृत्व सोमनाथ नलावडे, सांगली संघाचे नेतृत्व जोतीराम कदम तर अहिल्यानगर संघाचे नेतृत्व जमीर पठाण हे करणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ विनोद देशपांडे, विवेक डफळ, धीरज जाधव यांच्या हस्ते करण्यात होणार आहे.