
मुंबई : विविध खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धेत टाटा हॉस्पिटल क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची २५ वर्षे जबाबदारी पार पाडणारे माजी क्रिकेटपटू डॉ एस एच जाफरी यांचा समारोपदिनी विशेष गौरव करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा १० ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई येथे होणार असून, विविध रुग्णालयांचे बलाढ्य संघ यात सहभागी होणार आहेत. जखमी क्रीडापटूंना तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णालयीन क्रिकेटपटू सहकार्य करतात. त्यांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी या स्पर्धेची परंपरा अखंडित राखली आहे.
डॉ जाफरी यांचा भरीव योगदानासाठी गौरव
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित आत्माराम मोरे स्मृती आंतर रुग्णालय क्रिकेट स्पर्धेत डॉ एस एच जाफरी यांच्या क्रिकेटमधील योगदानाचा विशेष गौरव होणार आहे. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ अष्टपैलू खेळाने क्रिकेटचे मैदान गाजवले असून, निवृत्तीनंतरही टाटा हॉस्पिटल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ जाफरी हे वर्ल्ड कप २०११ चे मीडिया मॅनेजर आणि वर्ल्ड कप २०२३ चे ऑपरेशन्स मॅनेजर होते. तसेच, एक दिवसीय आणि टी २० क्रिकेटच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. क्रिकेट क्षेत्रातील योगदानासोबतच त्यांनी सामाजिक व आरोग्य क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे.
स्पर्धेत नावाजलेले हॉस्पिटल संघ सहभागी
या स्पर्धेत नानावटी हॉस्पिटल, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-अंधेरी, लीलावती हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, जे जे हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई, सोमय्या हॉस्पिटल यांसारखे नामवंत संघ सहभागी होत आहेत.
टॉप १० संघांना रोख पारितोषिकांसह आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांसाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच, प्रत्येक सामन्यातील दोन्ही संघातील उत्कृष्ट खेळाडूंनाही खास पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटन समितीचे कार्याध्यक्ष विराज मोरे आणि सरचिटणीस लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कप्तान प्रदीप क्षीरसागर, क्रिकेटपटू मनोहर पाटेकर, महेश शेट्ये आदी कार्यरत आहेत.