जळगाव येथे प्राथमिक शिक्षकांसाठी क्रीडा प्रशिक्षण उपक्रम

  • By admin
  • February 8, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

जळगाव : क्रीडा विकासासाठी प्राथमिक शिक्षकांसाठी ‘क्रीडा प्रशिक्षण’ राज्यातील पहिलाच प्रयोग जळगाव येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव जिल्हा परिषद जळगाव महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ द्वारा जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षणाचे जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.

क्रीडा प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल झोपे हे अध्यक्षस्थानी होते. ‘शिक्षकांनी क्रीडा प्रशिक्षणातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधावा असे अनिल झोपे यांनी सांगितले व या नाविण्यपूर्ण उपक्रमात स्वयंप्रेरणेने सहभागी शिक्षकांचे कौतुक केले.

प्रमुख अतिथी व जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी खेळाकडून गुणवत्तेकडे विद्यार्थ्यांना न्यावे असे आपल्या मनोगतात सांगितले. क्रीडा कार्यालयातील सुरेश थरकुडे व क्रीडा अधिकारी मीनल थोरात यांची यावेळी उपस्थिती होती.

योग विषयक मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक अनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासह शिक्षक व विद्यार्थी यांना उपयुक्त योग क्रिया करवून दाखवल्या. सत्यनारायण पवार यांनी वॉर्मअप, फिटनेस ॲक्टिव्हिटी, कुलिंग डाऊन आदींविषयी मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह करवून घेतले. शिक्षकांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे राज्य सहसचिव जयांशु पोळ यांनी खो-खो खेळ व नियमाविषयी मार्गदर्शन करताना प्राथमिक शाळांसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी कृतीसह करुन दाखवल्या. क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात यांनी खो-खो खेळाचे मार्गदर्शन करताना विविध बाबी स्पष्ट केल्या. प्रशांत कोल्हे यांनी कबड्डी खेळाचे नियम व डावपेचांचे मार्गदर्शन केले. प्राथमिक स्तरावर कबड्डी खेळासाठी पूर्वतयारी कशी घ्यावी याची माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी असणारे ॲथलेटिक्स इव्हेंटची मैदाने आणि विविध स्पर्धा याविषयी मार्गदर्शन केले. क्रीडा मार्गदर्शक सुरेश थरकुडे यांनी पूरक खेळ व मनोरंजक खेळ याचा प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण विकासासाठी कसा वापर करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

क्रीडा प्रशिक्षण उपक्रम यशस्वीतेसाठी टी के पाटील, महेश पाटील, अजित चौधरी, गोविंदा लोखंडे, गणेश लोडते, अशोक मदाने, देवेंद्र चौधरी, प्रफुल्ल सरोदे, निलेश मोरे, सुनील पवार, शाकीर अहमद, सोमनाथ लोखंडे, महेश तायडे, प्रमोद झलवार, मिलिंद नाईक, जितेंद्र झांबरे, प्रशांत आंभोरे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अजित चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल चौधरी यांनी केले. निलेश मोरे, गणेश लोडते यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *