
नागपूर : करुण नायरच्या शानदार नाबाद शतकाच्या बळावर विदर्भ संघाने रणजी करंडक उपांत्यपूर्व सामन्यात तामिळनाडू संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ८९ षटकात सहा बाद २६४ धावा काढल्या आहेत.
यंदाच्या रणजी हंगामात करुण नायर जबरदस्त फॉर्मात आहे. तीन बाद ४४ अशा बिकट स्थितीत विदर्भ संघ असताना करुण नायर याने बहारदार शतक ठोकून डाव सावरला. विदर्भ संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. अथर्व तायडे (०), ध्रुव शोरी (२६), आदित्य ठाकरे (५) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले.
दानिश मालेवार व करुण नायर या जोडीने चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. मालेवार ११९ चेंडूत ७५ धावांची खेळी करुन बाद झाला. त्याने १३ चौकार मारले. यश राठोड १३ तर कर्णधार अक्षय वाडकर २४ धावांवर बाद झाले. एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना करुण नायर याने चिवट फलंदाजी करत शतक ठोकले. नायरने १८० चेंडूंचा सामना करत १०० धावा काढल्या. त्याने एक षटकार व चौदा चौकार मारले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भ संघाने ८९ षटकात सहा बाद २६४ धावा काढल्या आहेत. त्यावेळी करुण नायर १०० तर हर्ष दुबे १९ धावांवर खेळत होते.
तामिळनाडू संघाकडून विजय शंकर याने ५० धावांत दोन गडी बाद केले. मोहम्मद (१-५०), सोनू यादव (१-५५), अजित राम (१-५०) व मोहम्मद अली (१-१६) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.