महाराष्ट्राची सुदेष्णा शिवणकर वेगवान धावपटू

  • By admin
  • February 8, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

संजीवनी जाधवला सुवर्णपदक तर प्रणव गुरव, किरणला रौप्यपदक

देहरादून : नाशिकची खेळाडू संजीवनी जाधव हिने दहा हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिला दिवस गाजविला. सातारा येथील खेळाडू सुदेष्णा शिवणकर हिने वेगवान धावपटूचा मान मिळविला, तर पुरुषांच्या गटात पुण्याचा खेळाडू प्रणव गुरव आणि करण यांनी रौप्यपदक जिंकले. 

राजीव गांधी क्रीडा संकुलातील गंगा आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्टेडियमवर शनिवारी या स्पर्धेचा पहिला दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने आनंददायी ठरला. सुदेष्णा शिवणकर हिने १०० मीटर धावण्याची शर्यत ११.७६ सेकंदात जिंकली. प्रणव गुरव याने शंभर मीटर्स धावण्याची शर्यत १०.३२ सेकंदात पार केली. त्याला अगदी थोडक्यात सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली.

महिलांच्या दहा हजार मीटर शर्यत संजीवनी जाधव हिने ३३ मिनिटे ३३.४७ सेकंद या वेळेत पूर्ण केले. या शर्यतीमध्ये सुरुवातीपासूनच तिने आघाडी घेतली होती. आणि शेवटपर्यंत तिने ही आघाडी कायम ठेवली. किंबहुना शेवटच्या टप्प्यात तिने साडेतीनशे मीटर्सची आघाडी घेतली होती. तिचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्ण पदक आहे. यापूर्वी तिने याच क्रीडा प्रकारात एक रौप्य व एक सुवर्णपदक जिंकले होते.

विजेतेपदाची खात्री होती : संजीवनी
यंदा विजेतेपद राखायचे माझे ध्येय होते आणि त्या दृष्टीनेच मी या शर्यतीचे नियोजन केले होते. सुवर्णपदकासाठी चिवट लढत झाली असती, तर विक्रमी वेळ नोंदविली असती. मोठी आघाडी होती तरीही सातत्यपूर्ण वेग ठेवला होता‌, असे २८ वर्षीय खेळाडू संजीवनी हिने सांगितले. संजीवनी ही नाशिक येथे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज ५ ते ६ तास सराव करीत आहे. ती येवला येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

किरणचे पदार्पणातच पदक
किरण याने दहा हजार मीटर्सचे अंतर २९ मिनिटे ०४.७६ सेकंदात पार केले हिमाचल प्रदेशा सावंत बरवाल यांनी ही शर्यत २८ मिनिटे ४९.९३ सेकंदात पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीमध्ये सात किलोमीटर पर्यंत किरण हा सावन बरोबर धावत होता मात्र नंतर साबण याने जोरदार मुसंडी मारून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकविली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिले पदक आहे. २३ वर्षीय खेळाडू किरण हा मूळचा परभणी जिल्ह्यातील उसळदवाडी या खेडेगावातील खेळाडू आहे. लहानपणीच मातृ व पितृछत्र गमावलेल्या किरण याला त्याच्या आजीनेच वाढविले आहे. बारावी इयत्ता पूर्ण केल्यानंतर तो पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट मध्ये हवालदार या पदावर काम करीत असून तेथे त्याला युनूस खान यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

मातीच्या मैदानावर सराव करीत सुदेष्णाची सोनेरी कामगिरी
सातारा येथे गेली आठ वर्षे मातीच्या मैदानावरच सराव करणाऱ्या सुदेष्णा हिने कृत्रिम ट्रॅक वर सराव करणाऱ्या खेळाडूंना मागे टाकत स्पृहणीय यश मिळवले. तिचे हे दुसरे सुवर्णपदक आहे २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते. 21 वर्षीय सुदेष्णा ही सातारा येथेच ज्येष्ठ प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेत तिने नेत्रदीपक यश मिळवले असून तिला इन्कम टॅक्स मध्ये नोकरी मिळाली आहे.

कृत्रिम ट्रॅक लवकर व्हावा : सुदेष्णा

आमच्या शहरात कृत्रिम ट्रॅक करिता शासकीय मान्यता मिळाली असून लवकरच हा ट्रॅक तयार करावा म्हणजे सातारा येथून आणखी आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असे सुदेष्णा हिने सांगितले.

दुखापतीवर मात करीत प्रणवचे कौतुकास्पद यश
जवळजवळ एक वर्ष पाठीच्या दुखण्यामुळे स्पर्धात्मक ॲथलेटिक्स पासून दूर असलेल्या प्रणव याने येथे रुपेरी कामगिरी करत शानदार पुनरागमन केले आहे. त्याचे हे दुसरे रौप्य पदक आहे तो मध्य रेल्वेमध्ये नोकरी करीत आहे. २३ वर्षीय खेळाडू प्रणव हा पुण्यातील सनस मैदानावर अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.  यापूर्वी त्याने राष्ट्रीय व राज्य स्तरावरील स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. 

प्रथमच ‘रोबो’चा उपयोग
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथमच ‘रोबो’चा उपयोग दिसून येत आहे. पदक वितरण प्रसंगी तसेच थाळी फेक स्पर्धेच्या वेळी ‘रोबो’चा उपयोग करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *