
लिजंड्स प्रीमियर लीग : निलेश गवई, इनायत अली सामनावीर

छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग सीझन ३ टी २० क्रिकेट स्पर्धेत डीएफसी श्रावणी संघाने साई श्रद्धा संघावर रोमहर्षक सामन्यात चार धावांनी विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात राउडी सुपर किंग्ज संघाने मीनाक्षी इंडस्ट्रीज संघावर २३ धावांनी विजय नोंदवला. या लढतीत निलेश गवई आणि इनायत अली यांनी सामनावीर किताब पटकावला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. साई श्रद्धा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डीएफसी श्रावणी संघाने १७ षटकात सर्वबाद १२७ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना साई श्रद्धा संघ १८.३ षटकात १२३ धावांवर सर्वबाद झाला. डीएफसी संघाने रोमांचक झुंज ४ धावांनी जिंकली.

या सामन्यात नितीन भुईगळ (४०), ज्ञानेश्वर वानखरे (३१), तन्वीर राजपूत (२४) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. नितीन याने तीन षटकार व तीन चौकार मारत मैदान गाजवले. गोलंदाजीत निलेश गवई (४-१४), ज्ञानेश्वर वानखरे (४-२९) यांनी प्रभावी स्पेल टाकत प्रत्येकी चार विकेट घेतल्या. आकाश अभंग याने ९ धावांत दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात राउडी सुपर किंग्ज संघाने मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाचा अटीतटीच्या झुंजीत २३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राउडी सुपर किंग्ज संघाने २० षटकात नऊ बाद १३८ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना मीनाक्षी इंडस्ट्रीज संघ १८.२ षटकात ११५ धावांत सर्वबाद झाला. या सामन्यात रमेश साळुंके (३७), भूषण घोळवे (३०), अतुल वालेकर (२७) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत इनायत अली याने १३ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. नितीन चव्हाण (२-१८) व राजू परचाके (२-२७) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक : १) डीएफसी श्रावणी : १७ षटकात सर्वबाद १२७ (अशोक शिंदे ८, नितीन भुईगळ ४०, वसीम ७, निकित चौधरी २१, अमान शेख ७, तन्वीर राजपूत नाबाद २४, इतर १९, ज्ञानेश्वर वानखरे ४-२९, आकाश अभंग २-९, इम्रान अली खान १-१२, विश्व शिनगारे १-२६, संतोष साह १-१०) विजयी विरुद्ध साई श्रद्धा : १८.३ षटकात सर्वबाद १२३ (आकाश अभंग १८, सुनील पल्लोड १५, फुझैल सिद्दिकी ६, आसिफ शेख १४, मनोज चोबे ५, इम्रान अली खान ६, ज्ञानेश्वर वानखरे ३१, विश्व शिनगारे १८, निलेश गवई ४-१४, बाळासाहेब मगर २-२१, अमान शेख १-२४, तन्वीर राजपूत २-२८). सामनावीर : निलेश गवई.
२) राउडी सुपर किंग्ज : २० षटकात नऊ बाद १३८ (इनायत अली १२, मयूर चौधरी ९, अतुल वालेकर २८, अलोक खांबेकर १३, भूषण घोळवे ३०, धैर्यशील गायकवाड ५, सनी १०, परीक्षित मुत्रक नाबाद १८, सय्यद जलिस नाबाद ७, राजू परचाके २-२७, रणजीत २-२९, नितीन चव्हाण २-१८, रमेश साळुंके १-१९, लक्ष्मण सूर्यवंशी १-१५) विजयी विरुद्ध मीनाक्षी इंडस्ट्रीज : १८.२ षटकात सर्वबाद ११५ (कार्तिक बाकलीवाल ५, नितीन चव्हाण ७, विजय अडलाकोंडा २१, रमेश साळुंके ३७, नितीन बेडवाल ९, रणजीत ११, इतर २२, इनायत अली ४-१३, परीक्षित मुत्रक २-२४, विराज चितळे १-१३, आशिष गवळी १-२३, सय्यद जलिस १-२३). सामनावीर : इनायत अली.