
देहरादून : अटीतटीने झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान उत्तराखंड संघावर २-१ अशी मात केली आणि ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये पुरुषांच्या गटात बाद फेरीच्या अशा कायम राखल्या. ऑलिम्पिकपटू व कर्णधार देवेंद्र वाल्मिकी याने दोन गोल करीत महाराष्ट्राच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
शेवटपर्यंत चुरशीने झालेल्या या सामन्यात वाल्मिकी याने चौदाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर द्वारा गोल करीत महाराष्ट्राचे खाते उघडले. या गोलच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या पंधरा मिनिटाच्या डावात आघाडी घेतली होती. पाठोपाठ दोन मिनिटांनी महाराष्ट्राने आणखी एक गोल करीत आपली बाजू बळकट केली. हा गोल ही वाल्मिकी याने पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवत नोंदवला. उत्तराखंड संघाने एक गोल केला. त्यांनी या सामन्यात बरोबरी साधण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु महाराष्ट्राच्या बचाव फळीने त्यांचे हे प्रयत्न असफल ठरविले.
साखळी गटात महाराष्ट्राने दोन सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत सोडविला आहे. त्यांना शेवटच्या लढतीत हरियाणाविरुद्ध झुंजावे लागणार आहे. या लढतीवरच महाराष्ट्राच्या बाद फेरीच्या संधी अवलंबून आहेत.