
नॅशनल डीपीएल सिझन ९ : मेहबूब शेख, साई महेश सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर नॅशनल डीपीएल सिझन ९ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत हैदराबाद स्पार्टन्स आणि थुंगा हॉस्पिटल्स या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यांत के मेहबूब शेख आणि साई महेश यांनी सामनावीर किताब संपादन केला.
एमजीएम क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात ठाणे सुपर्ब संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात आठ बाद १७२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना थुंगा हॉस्पिटल्स संघाने १८ षटकात तीन बाद १७३ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला आणि अंतिम फेरी गाठली. या सामन्यात डॉ सतीश शेट्टी (५६), डॉ रोनक महाजन (५५) व एसआर (५२) यांनी आक्रमक अर्धशतके ठोकली. गोलंदाजीत डॉ विनय सांगळे (२-२३), नरेंद्र भूमकर (२-३४) व ब्रिजेश यादव (२-२७) यांनी प्रभावी स्पेल टाकत प्रत्येकी दोन गडी बाद केले. या सामन्यात के मेहबूब शेख याने सामनावीर किताब पटकावला.
पाटील क्रिकेट मैदानावर (रामपूर) झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात हैदराबाद स्पार्टन्स संघाने छत्रपती किंग्ज संघावर सहा विकेट राखून विजय नोंदवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. छत्रपती किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सात बाद १३६ धावसंख्या उभारली. हैदराबाद स्पार्टन्स संघाने १७.४ षटकात चार बाद १४१ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला. या सामन्यात साई महेश (४५), डॉ कार्तिक बाकलीवाल (४२) व चंदन (३५) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत कृष्ण भार्गव (२-३०), अब्दुल्ला बिलाल (१-१७) व साई महेश (१-२२) यांनी सुरेख गोलंदाजी केली. या सामन्यात साई महेश याने सामनावीर किताब संपादन केला.
तत्पूर्वी, झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात हैदराबाद स्पार्टन्स संघाने आयकॉन हॉस्पिटल्स संघाचा १७ धावांनी पराभव केला. या सामन्यात हैदराबाद स्पार्टन्स संघाने १३ षटकात नऊ बाद १२६ धावा काढल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना आयकॉन हॉस्पिटल्स संघ १३ षटकात सात बाद १०९ धावा काढू शकला. हैदराबाद स्पार्टन्स संघाने १७ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात साई महेश (४८), डॉ तौसिफ खान (३३), अविनाश (२०) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत डॉ तौसिफ खान याने १४ धावांत चार विकेट घेत भेदक स्पेल टाकला. साई महेश याने २५ धावांत चार विकेट घेत आपला ठसा उमटवला. डॉ अमर मते (३-३०) याने तीन विकेट घेतल्या. या लढतीत साई महेश याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यात ठाणे सुपर्ब संघाने चंद्रा रुग्णालय संघाचा १४ धावांनी पराभव केला. ठाणे सुपर्ब संघाने १५ षटकात दोन बाद १४० धावा काढल्या. चंद्रा रुग्णालय संघ १५ षटकात आठ बाद १२६ धावा काढण्यात यशस्वी ठरला. ठाणे सुपर्ब संघाने १४ धावांनी विजय साकारत आगेकूच केली. या सामन्यात पवन बडे (४४), एसआर (३९), डॉ शकील पठाण (३८) यांनी शानदार फलंदाजी केली. गोलंदाजीत डॉ सचिन पाटील (३-१७), तपन कुमार दास (२-२७) व डॉ वरुण म्हात्रे (१-१४) यांनी प्रभावी मारा केला. या सामन्यात डॉ सचिन पाटील याने सामनावीर किताब पटकावला.