
मुंबई सर्वबाद ३१५, हरियाणा पाच बाद २६३ धावा
कोलकाता : कर्णधार अंकित कुमारच्या शानदार १३६ धावांच्या बळावर हरियाणा संघाने रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई संघाविरुद्ध दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद २६३ धावा काढल्या आहेत. हरियाणा संघाला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अद्याप ५२ धावांची आवश्यकता आहे.

सामन्याचा दुसरा दिवस हरियाणाचा सलामीवीर अंकित कुमार याने गाजवला. लक्ष्य दलाल आणि अंकित कुमार या सलामी जोडीने हरियाणाला सुरेख सुरुवात करुन दिली. या सलामी जोडीने ८७ धावांची भागीदारी केली. लक्ष्य दलाल चार चौकारांसह ३४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर यशवर्धन दलाल याने अंकित कुमार याला सुरेख साथ देत दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. यशवर्धन एक षटकार व तीन चौकारांसह ३६ धावा काढून बाद झाला.
हिमांशू राणा (३) व निशांत सिंधू (२०) हे स्वस्तात बाद झाले. एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना कर्णधार अंकित कुमार याने चिवट फलंदाजी करत शतक साजरे केले. अंकितने २०६ चेंडूंचा सामना करत १३६ धावा फटकावत संघाची स्थिती भक्कम केली. त्याने आपल्या शतकी खेळीत २१ चौकार मारले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा (२०) व अनुज ठकराल (५) ही जोडी खेळत होती. हरियाणा संघाने ७२ षटकात पाच बाद २६३ धावा काढल्या आहेत. फलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या शम्स मुलानी (२-५९) व तनुष कोटियन (२-५७) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत गोलंदाजीतही आपली क्षमता दाखवली. शार्दुल ठाकूर याने ४७ धावांत एक बळी मिळवला.
तत्पूर्वी, मुंबई संघाचा पहिला डाव ८८.२ षटकात ३१५ धावसंख्येवर संपुष्टात आला. तनुष कोटियन याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. तो ९७ धावांवर बाद झाला. त्याने १३ चौकार मारले. रॉयस्टन डायस ७ धावांवर बाद झाल्याने मुंबईचा डाव संपुष्टात आला. मोहित अवस्थी १८ धावांवर नाबाद राहिला.
हरियाणा संघाकडून अंकुश कंबोज (३-७१) व सुमित कुमार (३-८१) यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. अनुज ठकराल (१-५९), अजित चहल (१-२१), जयंत यादव (१-३२) व निशांत सिंधू (१-५०) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.