महाराष्ट्र महिला टेबल टेनिस संघ उपांत्य फेरीत 

  • By admin
  • February 9, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

गणेश माळवे 

देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या टेबल टेनिस संघाने पुरुष आणि महिला गटात सलामीचे सामने जिंकून स्पर्धेची सुरुवात शानदार केली आहे. महाराष्ट्र महिला संघाने दिल्ली व तामिळनाडू या संघांना पराभूत करून उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. 

या स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्र संघाने दिल्ली संघाचा ३-० असा सहज पराभव केला. तनिषा कोटेचा हिने गरिमा गोयल हिचा ११-५, ११-५, ११-६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सायली वाणी हिने लक्षिजा नारंग हिचा ११-८, ११-५, ९-११, ११-५ असा पराभव करत संघाची स्थिती भक्कम केली. कर्णधार दिया चितळे हिने वनशिखा बार्गे हिचा १२-१०, ११-८, ११-९ असा पराभव करुन संघाला ३-० असा मोठा विजय मिळवून दिला. 

महिला गटात महाराष्ट्राचा दुसरा सामना तामिळनाडू संघाशी झाला. यात महाराष्ट्र संघाने ३-१ ने विजय नोंदवला. तनिषा कोटेचा हिने काव्यश्री बस हिचा ८-११, १२-१०, ११-५, २-११, ११-४ असा पराभव केला. दिया चितळे हिने सेलेना हिचा ११-९, ११-३, ११-८ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. रिथ रिशा टेनिसन हिने मानिनी शिवास हिच्यावर ५-११, ११-८ ११-९, ५-११, ८-११ असा विजय संपादन केला. तनिषा कोटेचा हिने सेलेना हिचा १०-११, ४-११, १५-१३, ११-७, ११-७ अशा चुरशीच्या लढतीत विजय नोंदवत महाराष्ट्र संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

पुरुष गटात महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगाल संघावर अटीतटीच्या झुंजीत ३-२ असा विजय नोंदवला. महाराष्ट्राच्या दीपित पाटील याने आकाश पाल याच्यावर ११-७, ३-११, ११-८, १३-११, ११-८ असा विजय साकारत संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या लढतीत रेगन अल्बुकर्क याने अनिरभान घोष याचा १३-११, ११-७, ११-६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या सामन्यात यश मोदी याने अनिकेत सेन याच्यावर ९-११, ११-९, ९-११ असा विजय नोंदवला.

महिला संघास आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुनील बाब्रास, पुरुष संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक महेंद्र चिपळूणकर, संघ व्यवस्थापक म्हणून श्रीराम कोनकर, गणेश माळवे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *