
हल्दवानी : ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी मधील दोन्ही प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम राखली आहे. सेबर व फॉईल या दोन्ही क्रीडा प्रकारांमधील वैयक्तिक गटात पदकाच्या आशा आहेत.
महाराष्ट्राच्या कशिश भरड हिने तामिळनाडूच्या बेनी क्युभेई हिच्यावर मात करीत विजयी सलामी दिली. सुरुवातीपासूनच तिने आक्रमक खेळ करीत ही लढत सहज जिंकली. तिची सहकारी शर्वरी गोसवडे हिने केरळच्या एस सौम्या हिच्यावर नेत्रदीपक विजय मिळविला. गौरी मंगलसिंग या महाराष्ट्राच्या खेळाडूने रीष युथुसेरी या केरळच्या खेळाडूला सहज पराभूत केले. महाराष्ट्राच्या श्रुती जोशी हिला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली.
पुरुष गटात मिलिंद जहागीरदार याने बिहारच्या तुषार कुमार याला पराभूत केले तर त्याचा सहकारी शकीर अंबीर याने हरियाणाच्या सचिन कुमार याचे आव्हान संपुष्टात आणले. महाराष्ट्राच्याच मनोज पाटील याला पुढे चाल मिळाली. मात्र तुषार आहेर या महाराष्ट्राच्या खेळाडूचे आव्हान राजस्थानच्या गजेन चौधरी याने संपुष्टात आणले.