
देहरादून : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिम्नॅस्टिक्समधील ॲक्रोबॅटिकच्या विविध गटात पदकांच्या दिशेने वाटचाल कायम राखली.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियम वरील भागीरथी संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या यज्ञेश भोस्तेकर, नमन महावर, रितेश बोराडे व प्रशांत गोरे यांच्या संघाने पुरुषांच्या सांघिक ॲक्रोबॅटिक मध्ये प्रथम क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. त्यांचे ४३.४६० गुण झाले आहेत.
याच क्रीडा प्रकारातील पुरुषांच्या दुहेरीत गणेश पवार व आदित्य कालकुंद्रे यांनी तिसऱ्या क्रमांकासह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांचे ३९.९५० गुण झाले आहेत. मिश्र दुहेरीत रिद्धी जयस्वाल व शुभम सरकटे यांनी प्रथम क्रमांकासह अंतिम फेरी गाठली. त्यांचे ३५.९७० गुण झाले आहेत.
महिलांच्या सांघिक विभागात सोनाली बोराडे, अक्षता ठोकळे व अर्णा पाटील यांच्या संघाने प्रथम क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. त्यांचे ४१.७८० गुण झाले आहेत. महिलांच्या दुहेरीत ऋतुजा जगदाळे व निक्षिता खिलारे यांनी प्रथम क्रमांकासह अंतिम फेरी गाठली. त्यांचे ३३.७४० गुण झाले आहेत.