
रोहितचे धमाकेदार ३२ वे शतक, ३३८ षटकारांसह ख्रिस गेलचा विक्रम मोडला
कटक : कर्णधार रोहित शर्माच्या (११९) तुफानी शतकाच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघावर चार गडी राखून मोठा विजय संपादन केला. या विजयासह भारताने तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने हा सामना ४४.३ षटकात सहा बाद ३०८ धावा फटकावत मालिकेत आपले वर्चस्व कायम ठेवले.
गेल्या अनेक सामन्यात कमालीचा फ्लॉप ठरत असलेल्या रोहित शर्माला फॉर्म गवसला आणि रोहितने त्याच्या खास शैलीत तुफानी शतक झळकावले. रोहितच्या शतकाने क्रिकेट चाहत्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. रोहितने ७६ चेंडूत शतक झळकावले. रोहितचे हे ३२ वे शतक आहे. शतक साजरे करताना रोहितने सात टोलेजंग षटकार ठोकत ख्रिस गेल याचा विक्रम मोडला. गिलने ३०१ सामन्यात ३३१ षटकार मारले आहेत. शाहिद आफ्रिदीने ३५१ षटकार मारले आहेत. रोहितचे ३३८ षटकार झाले आहेत. रोहितने ९० चेंडूत सात षटकार व १२ चौकारांसह ११९ धावा फटकावल्या.
रोहित शर्मा व शुभमन गिल या सलामी जोडीने १६.४ षटकात १३६ धावांची भागीदारी करत विजयाचा सुरेख पाया रचला. गिल (६०) याने सलग दुसरे अर्धशतक ठोकले. विराट कोहली केवळ ५ धावा काढून बाद झाला. श्रेयस अय्यर यानेतीन चौकार व एक षटकार मारत ४४ धावा फटकावल्या. दुर्दैवाने अय्यर धावबाद झाला. केएल राहुल १० धावांवर उसळत्या चेंडूवर आपली विकेट गमावून तंबूत परतला. हार्दिक पंड्या षटकार मारण्याच्या प्रयत्नात १० धावांवर बाद झाला.
अक्षर पटेल (नाबाद ४१) आणि रवींद्र जडेजा (नाबाद ११) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडकडून जेमी ओव्हरटन याने २७ धावांत दोन गडी बाद केले.
इंग्लंड सर्वबाद ३०४
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३०४ धावा केल्या. इंग्लंडला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात जो रूट आणि बेन डकेट यांनी सर्वात मोठे योगदान दिले. नागपूर एकदिवसीय सामन्यातील अपयशानंतर जो रूटने कटकमध्ये अर्धशतक झळकावले. रूटने ६९ धावांची खेळी खेळली. शेवटच्या षटकांमध्ये, लियाम लिव्हिंगस्टोनने इंग्लंडला ३०० च्या पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावली. टीम इंडियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज रवींद्र जडेजा होता, ज्याने एकूण ३ विकेट्स घेतल्या.
फिल साल्ट आणि बेन डकेट यांनी ८१ धावांची सलामी भागीदारी करत इंग्लंड संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु साल्ट २६ धावा करून बाद झाला. त्यानंतर थोड्याच वेळात, डकेट देखील ६५ धावांवर बाद झाला. हॅरी ब्रुकला सुरुवात चांगली मिळाली पण तो त्याच्या ३१ धावांचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. बटलर आणि रूट यांच्यात ५१ धावांची अर्धशतकी भागीदारी झाली.