
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शंभूराजे बहुउद्देशीय संस्था, रामराव शिंदे मित्र परिवार व सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या ओपन बुद्धिबळ स्पर्धेत १८ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह १८३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.
पहिल्या फेरीत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू मानस गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त विजय पंगुडवाले, भारत संचार निगमचा राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर बसारगीकर, बार्शीचा शंकर साळुंके, प्रसन्न जगदाळे, दत्तात्रय गोरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे, अमित मुदगुंडी, प्रज्वल कोरे यांनी खुल्या गटात विजयी सलामी दिली. १२ वर्षांखालील गटात मानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त वेदांत मुसळे, बार्शीची सान्वी गोरे, श्रेयस कुदळे, पृथा ठोंबरे, मनस्वी क्षीरसागर यांनीदेखील आकर्षक विजय मिळविले. तसेच ८ वर्षांखालील गटात नमन रंगरेज, नियान कंदीकटला, पाच वर्षीय मिश्का चिट्टे या उदयोन्मुख खेळाडूंसह जिल्हा परिषद शाळेतील अंशुमन गायकवाड, सिद्धांत कसबे, संस्कृती चंदनशिवे, पंचशीला शिंदे यांनीदेखील उत्कृष्ट खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा प्राथमिक पतसंस्थेचे चेअरमन तानाजी गुंड व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली. यावेळी बार्शीचे दत्तात्रय गोरे, माजी चेअरमन राजन ढवण, स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे नेते उमाजी जाधव, जुनी पेन्शन संघटनेचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, सहकार्याध्यक्ष विक्रम जाधव, टाकळीकर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापिका नीलम उपाध्ये, आंतरराष्ट्रीय पंच व संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा, यश इंगळे, पद्मजा घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले.