
एमसीए सीनियर महिला टी २० स्पर्धा : कोल्हापूर महिला संघ उपविजेता
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए सीनियर महिला टी २० चॅम्पियनशिप स्पर्धेत ज्युडिशियल महिला संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात कोल्हापूर महिला संऑघाचा ४८ धावांनी पराभव करत ज्युडिशियल महिला संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
एमसीए क्रिकेट ग्राउंड २ वर ज्युडिशियल व कोल्हापूर यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. ज्युडिशियल महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात चार बाद १७३ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना कोल्हापूर महिला संघाने २० षटकात आठ बाद १२५ धावा काढल्या. ज्युडिशियल महिला संघाने ४८ धावांनी सामना जिंकत विजेतेपद पटकावले.
या अंतिम सामन्यात गौतमी नाईक हिने धमाकेदार फलंदाजी केली. गौतमी हिने ५८ चेंडूत ८२ धावांची वादळी खेळी केली. तिने दोन षटकार व अकरा चौकार मारले. अनुजा पाटील हिने आठ चौकारांसह ४२ चेंडूत ४४ धावा फटकावल्या. शिवाली शिंदे हिने ३२ चेंडूत ३९ धावा काढल्या. तिने सहा चौकार मारले. गोलंदाजीत सायली लोणकर हिने १५ धावांत तीन विकेट घेत आपला ठसा उमटवला. एकता हिने ७ धावांत दोन तर सेजल सुतार हिने २७ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : ज्युडिशियल महिला संघ : २० षटकात चार बाद १७३ (गौतमी नाईक ८२, भाविका अहिरे ३१, आयेशा शेख ११, सायली लोणकर नाबाद ३३, प्रज्ञा वीरकर नाबाद २, आस्मी कुलकर्णी ६, सेजल सुतार २-२७, सौम्यलता २-२३) विजयी विरुद्ध कोल्हापूर महिला संघ : २० षटकात आठ बाद १२५ (शिवाली शिंदे ३९, सौम्यलता १७, अनुजा पाटील ४४, सायली लोणकर ३-१५, एकता २-७).