बाराशे धावपटूंनी दिला ‘रन फॉर किडनी’चा संदेश

  • By admin
  • February 10, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

‘सेवा भवन दौड’ आशुतोष पात्रा, अमृता मांडवेने जिंकली

पुणे : सेवा भवन या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे रविवारी आयोजित ‘सेवा भवन दौड’मध्ये उत्साहाने सहभागी होत १२०० धावपटूंनी ‘रन फॉर किडनी हेल्थ’ हा संदेश दिला. सेवा भवन दौडच्या दहा किलोमीटर गटात आशुतोष पात्रा आणि अमृता मांडवे यांनी विजेतेपद पटकावले. युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

सेवा भवन दौड मधील दहा किलोमीटर गटाच्या शर्यतीचा प्रारंभ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतून करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार डॉ मेधा कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, ‘गिरिप्रेमी’चे उमेश झिरपे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, सेवा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री श्रीपाद दाबक, आयर्नमॅन निखिलेश पंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा भवन दौड हा उपक्रम यशस्वीरित्या घेण्यात आला.

ही शर्यत आशुतोष पात्रा याने जिंकली. त्याने ही शर्यत ४० मिनिटे ४९ सेकंद या वेळेत पूर्ण केली. या शिवाय ‘चॅरिटी रन’ हा उपक्रमही आयोजित करण्यात आला होता. सेवा भवन दौड या उपक्रमापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आल्याचे समितीचे कार्यवाह प्रमोद गोऱ्हे यांनी सांगितले. सेवा भवन प्रकल्प समितीच्या अध्यक्षा डॉ स्वाती बेलसरे, कार्यवाह पलाश देवळणकर, सहकार्यवाह उमा जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश उभे यांनी संयोजन आणि सारंग भिडे यांनी सूत्रसंचालन केले.

‘सेवा भवन दौड’ मधील विजेते
दहा किलोमीटर (पुरुष गट) : १. आशुतोष पात्रा, २. पंकज कश्यप, ३. अन्वय नेहरकर.
दहा किलोमीटर (महिला गट) : १. अमृता मांडवे, २. अमृता सोनसळे, ३. उज्ज्वला मरगळे.
दहा किलोमीटर (साठ वर्षांवरील गट) : १. जयंत पाठक, २. राजेंद्र गुजराथी, ३. प्रशांत वडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *