
मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याला भविष्यातही भक्कम पाठिंबा देऊ, असे आश्वासन वन खात्याचे मंत्री गणेश नाईक यांनी दिले. आखाड्यातील नवीन मॅटच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
२४ वर्षांचा प्रवास आणि प्रगतीचे कौतुक
सन २००० मध्ये मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते श्री गणेश आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले होते. आज २४ वर्षांनंतर आखाड्याचा विस्तार पाहून जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी कुस्तीपटूंनी केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच, आखाड्याला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने भविष्यात भव्य कुस्ती मैदान भरवण्याची मागणी मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मिलिंद लिमये यांनी केली.

गणेश नाईक यांचा सत्कार आणि कुस्तीपटूंचा सन्मान
कार्यक्रमात मिलिंद लिमये यांच्या हस्ते गणेश नाईक यांचा शाल, पुष्पगुच्छ व बजरंगबलीची मूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, राज्यस्तरीय प्रतिष्ठा क्रीडारत्न पुरस्कार २०२५ विजेते वस्ताद वसंतराव पाटील यांचा विशेष गौरव गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी भाजप ज्येष्ठ नेते ओमप्रकाश गरोडिया, लायन्स क्लब अध्यक्ष नारायण पोद्दार, अग्रवाल सेवा समिती मार्गदर्शक, शेतकरी शिक्षण मंडळ अध्यक्ष अजित पाटील, माजी नगरसेवक प्रकाश दुबोले आणि विद्या रेवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्कृष्ट कुस्तीपटूंचा गौरव
कार्यक्रमात विशाल माटेकर, विशाल जाधव, सूरज माने, मनीषा शेलार, सुदीक्षा जैस्वर, डॉली गुप्ता, मनस्वी राऊत आणि ओम जाधव या कुस्तीपटूंचा सत्कार गणेश नाईक यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला. पैलवानांना भेटवस्तू श्री साई ज्वेलर्सचे मालक सुधाकर गायकवाड यांनी दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद लिमये यांनी केले. वरिष्ठ शिक्षक बलराज बागल यांनी समालोचन केले. या कार्यक्रमामुळे कुस्ती क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली असून, श्री गणेश आखाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे.