स्कोडा ऑटो फोक्सवॅगन संघाला विजेतेपद

  • By admin
  • February 10, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर : मुंबई येथे झालेल्या कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत स्कोडा ऑटो फोक्सवॅगन कंपनी छत्रपती संभाजीनगर संघाने बलाढ्य संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत ११५ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत स्कोडा ऑटो संघाने मुंबई, कोल्हापूर, रायगड या बलाढ्य संघांचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. उत्कृष्ट कबड्डीपटूंची खाण समजल्या जाणाऱ्या साई सेवा क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी स्कोडा ऑटो संघाकडून खेळताना बहारदार कामगिरी नोंदवली.

विजेत्या स्कोडा ऑटो फोक्सवॅगन कंपनी संघात अल्केश चव्हाण, कृष्णा पवार, राहुल टेके, गणेश चव्हाण, ईश्वर पठाडे, शंकर मईधने, नितीन जाधव, योगेश चव्हाण, आदेश जाधव, भारत भवर, आशिष जाधव या खेळाडूंचा समावेश होता. राहुल टेके, ईश्वर पठाडे, गणेश चव्हाण यांच्या तुफानी चढाया व अल्केश चव्हाण, कृष्णा पवार, शंकर मईधने, नितीन जाधव, योगेश चव्हाण, आदेश जाधव, भारत भवर, अलताब शेख याच्या आक्रमक उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण व चढाईच्या जोरावर सर्व सहभागी संघावर मात करीत मुंबई कामगार कल्याण मंडळाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवले.

या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट चढाई म्हणून ईश्वर पठाडे याला पारितोषिक मिळाले, साई सेवा क्रीडा मंडळातील सर्व खेळाडूंना राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ माणिक राठोड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्कोडा ऑटो संघाचे प्रशिक्षक म्हणून सुभाष पवार यांनी काम पाहिले, या यशाबद्दल स्कोडा कंपनीच्या मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.

भगवती साखर कारखाना कोल्हापूर आणि स्कोडा ऑटो फोक्सवॅगन छत्रपती संभाजीनगर यांच्यात अंतिम सामना झाला. बलाढ्य कोल्हापूर संघावर मात करत स्कोडा ऑटो कंपनीने स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

विजेत्या संघास कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, आमदार भाई जगताप, आमदार कालीदास कोळंबकर यांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानपत्र व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

स्कोडा ऑटो एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष संजय राठोड, एचआर डायरेक्टर सरमा चीलारा, विभाग प्रमुख एचआर रामहरी कुटे, युवराज डांगे, युनियन उपाध्यक्ष नंदु जाधव, भूषण आवारे, सचिव खंडेराव देवरे, सहसचिव विलास थोरात, रवींद्र गव्हाणे, खजिनदार अशोक ताजनपुरे, संतोष सरोदे, जितेश बोरोले व संघटनेच्या सर्व सभासदांनी गुणवंत प्रतिभावान कबड्डी संघातील खेळाडू व प्रशिक्षक व्यवस्थापक यांचे कंपनीच्या वतीने अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *