
लिएंडर पेस, मेरी कोम, सायना नेहवालचा समावेश
नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने नवीन प्रतिभेचा शोध घेण्यासाठी क्रीडा सल्लागार समिती स्थापन केली आहे. या समितीत लिएंडर पेस, मेरी कोम आणि सायना नेहवाल या दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

निवडीमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्याबरोबरच नवीन प्रतिभेचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना जोपासण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने १७ सदस्यांची क्रीडा सल्लागार समिती स्थापन केली आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते लिएंडर पेस, सायना नेहवाल, मेरी कोम यांचाही समावेश आहे.

ही समिती खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवेल. क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या समितीच्या उपाध्यक्ष असतील. ही समिती खेळाडूंच्या तक्रारींचे निराकरण देखील करेल. समितीच्या इतर सदस्यांमध्ये शायनी अब्राहम, जफर इक्बाल, हिना सिद्धू यांचा समावेश आहे.
समितीला मदत करण्यासाठी क्रीडा तज्ञांचे एक पॅनेल देखील तयार करण्यात आले आहे. त्यात राणी रामपाल, विजेंदर सिंग, अलका तोमर, हंसा शर्मा, डीके राठोड, डोला बॅनर्जी, शिव सिंग यांसारखे खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत.