
कोलकाता : कर्णधार अजिंक्य रहाणे (नाबाद ८८) आणि सूर्यकुमार यादव (७०) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर मुंबई संघाने उपांत्यपूर्व रणजी सामन्यात हरियाणा संघाविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेर २९२ धावांची आघाडी घेतली आहे.
मुंबई संघाने दुसऱ्या डावात ६७ षटकांच्या खेळात चार बाद २७८ धावसंख्या उभारुन सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे. दुसऱ्या डावात आयुष म्हात्रे व आकाश आनंद या सलामी जोडीने ३४ धावांची भागीदारी केली. आनंद १० धावांवर बाद झाला. त्यानंतर आयुष म्हात्रे पाच चौकारांसह ३१ धावांवर बाद झाला. सिद्धेश लाड व अजिंक्य रहाणे या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. सिद्धेश लाड ४३ धावा काढून तंबूत परतला. त्याने एक षटकार व चार चौकार मारले.
तीन बाद १०० अशा स्थितीत अजिंक्य रहाणे व सूर्यकुमार यादव या जोडीने चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी करत संघाची स्थिती भक्कम केली. सूर्यकुमार यादव याने ८६ चेंडूत ७० धावांची धमाकेदार खेळी केली. आपल्या आक्रमक खेळीत सूर्यकुमार याने दोन उत्तुंग षटकार व आठ चौकार ठोकले. अजिंक्य रहाणे याने १४२ चेंडूंचा सामना करत नाबाद ८८ धावा फटकावल्या आहेत. शतकासाठी त्याला केवळ १२ धावांची गरज आहे. त्याने दहा चौकार मारले. शिवम दुबे याने ४१ चेंडूत नाबाद ३० धावा फटकावत कर्णधाराला सुरेख साथ दिली. दुबेने पाच चौकार मारले. हरियाणा संघाकडून अनुज ठकराल याने ६१ धावांत दोन विकेट घेतल्या. सुमित कुमार (१-४२) व जयंत यादव (१-५८) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
तत्पूर्वी, हरियाणा संघाचा पहिला डाव ८४.५ षटकात ३०१ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे मुंबई संघाने पहिल्या डावात महत्वाची १४ धावांची आघाडी घेतली. शार्दुल ठाकूर याने ५८ धावांत सहा विकेट घेऊन हरियाणाला ३०१ धावांवर रोखण्यात मोठी भूमिका पार पाडली. शम्स मुलाणी (२-६८), तनुष कोटियन (२-५७) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत मोलाचे योगदान दिले. मुंबईने पहिल्या डावात ८८.२ षटकात सर्वबाद ३१५ धावा काढल्या आहेत.