
नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात विदर्भ संघाने तामिळनाडू संघाविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेर २९७ धावांची आघाडी घेतली आहे. विदर्भ संघाने दुसऱ्या डावात पाच बाद १६९ धावा काढल्या आहेत.
पहिल्या डावात विदर्भ संघाने १२१.१ षटके फलंदाजी करत सर्वबाद ३५३ धावसंख्या उभारली. प्रत्युतरात तामिळनाडू संघ पहिल्या डावात २२५ धावा काढू शकला. विदर्भ संघाने पहिल्या डावात १२८ धावांची आघाडी घेत सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तामिळनाडू संघाकडून पहिल्या डावात आंद्रे सिद्धार्थ याने सर्वाधिक ६५ धावा काढल्या. प्रदोष पॉल याने ४८ धावांचे योगदान दिले. विदर्भ संघाकडून आदित्य ठाकरे याने ३४ धावांत पाच विकेट घेत संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यश ठाकूर (२-७८) आणि नचिकेत भुते (२-५४) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
विदर्भ संघाने दुसऱ्या डावात ६२ षटके फलंदाजी करत पाच बाद १६९ धावा काढल्या. विदर्भ संघाची आघाडी २९७ धावांची झाली आहे. अथर्व तायडे (१९), ध्रुव शोरी (२०), करुण नायर (२९), कर्णधार अक्षय वाडकर (८) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. यश राठोड याने ११९ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी करत डावाला आकार दिला. त्याने पाच चौकार मारले. हर्ष दुबे याने नाबाद २९ धावा फटकावत सुरेख साथ दिली. तामिळनाडू संघाकडून साई किशोर याने ४७ धावांत दोन गडी बाद केले.