महाराष्ट्राची ज्युदोपटू श्रद्धा चोपडेला सुवर्णपदक 

  • By admin
  • February 10, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

आकांक्षा शिंदेला रौप्यपदक

डेहराडून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ज्युदोमध्ये महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडे हिने सुवर्णपदक, पटकावले. तसेच आकांक्षा शिंदे हिने रौप्यपदकाची कमाई केली.
 
मोनल संकुलात सुरू असलेल्या ज्युदो स्पर्धेत महिलांच्या ५२ किलो गटात छत्रपती संभाजीनगरच्या श्रद्धा चोपडे हिने अंतिम लढतीत मेहरुख मकवाना या गुजरातच्या खेळाडूवर एकतर्फी विजय मिळविला.‌ या स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. यापूर्वी तिने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याखेरीज तिने आफ्रिकन खुल्या स्पर्धेतही एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकले आहे. 

१९ वर्षाची श्रद्धा चोपडे ही यशपाल सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. तिचे वडील कडूबा चोपडे हे देखील राष्ट्रीय कुस्ती व ज्युदोपटू आहेत. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन तिने ज्युदोमध्ये करिअर केले आहे. ‘सुवर्णपदक जिंकण्याची मला खात्री होती. कारण पॅरिस येथे नुकतेच मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सराव शिबिरात अद्यावत प्रशिक्षण घेतले आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील माझी कामगिरी सातत्यपूर्ण झाली आहे, असे श्रद्धा चोपडे हिने सांगितले.

४८ किलो गटाच्या अंतिम लढतीत आकांक्षा शिंदे हिने उत्तर प्रदेशच्या अस्मिता डे हिला कडवी लढत दिली. मात्र, अस्मिताने अडीच मिनिटांनंतर एका गुणांची कमाई करीत गुणांचे खाते उघडले. त्यानंतर आकांक्षाने गुण मिळविण्यासाठी जीवाचे रान केले. मात्र, बचावात्मक पवित्रा घेतलेल्या अस्मिताने आकांक्षाला गुण मिळणार नाही याची दक्षता घेत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. आकांक्षाला अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 

आकांक्षा शिंदे ही नाशिकची खेळाडू असून तिने या स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले आहे. यापूर्वी तिने विविध वयोगटातील गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अर्धा डझन पदके जिंकली आहेत. नाशिक येथील एच ए एल महाविद्यालयात ती वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम करीत आहे. १९ वर्षीय खेळाडू आकांक्षा हिचे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आहे.

पुरुषांच्या ६० किलो गटातील कांस्यपदकाच्या लढतीत महाराष्ट्राच्या श्रावण शेडगे याला उत्तर प्रदेशच्या मोनी शर्मा याच्याकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीत श्रावण याने मोनी याला चिवट लढत दिली. मात्र, सडनडेथपर्यंत झालेल्या लढतीत गोल्डन स्कोअरच्या जोरावर मोनीने बाजी मारत कांस्यपदक जिंकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *