शेतकरी कन्या दीप्ती काळमेघची सुवर्ण भरारी

  • By admin
  • February 10, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये कोल्हापूरच्या सौरभ पाटीलला सलग दुसर्‍यांदा सुवर्ण

हल्दवानी : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांच्या मुलांनी सुवर्णयशाला गवसणी देत स्पर्धेचा चौदावा दिवस गाजविला. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये शेतकरी कुटुंबियातील दीप्ती काळमेघसह सौरभ पाटीलने सुवर्ण पदकाला गवसणी घातली.  अमरावतीच्या दिप्ती हिने पदार्पणातच सुवर्णसह रौप्य पदकाची, तर कोल्हापूरच्या सौरभने सलग दुसर्‍यांदा सुवर्ण भरारी घेतली. बारावी परीक्षेला दांडी मारत दीप्तीने सुवर्ण भरारी घेतली आहे.
 
गौलापार येथे सुरू असलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सलग दुसर्‍या दिवशी जय महाराष्ट्राचा जयजयकार घुमला. बारावीत शिकणार्‍या १७ वर्षीय दीप्ती काळमेघने सकाळच्या सत्रात बायथले प्रकारात रूपेरी यश संपादन केले. दुपारच्या सत्रात दीप्तीने सौरभ पाटीलसह सोनेरी यशाला गवसणी घातली. 

अमरावतीच्या शेतकर्‍याची मुलगी असणारी दीप्ती ही पुण्यात शॉर्क जलतरण क्लबमध्ये शेखर खासनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दीप्ती काळमेघ ही अमरावतीच्या शिवाजी कॉलेजमध्ये  बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मंगळवार ११ फेब्रुवारीपासून तिची बोर्ड परीक्षा सुरू होत आहे. तरीही पहिले तीन विषयाच्या पेपरला दांडी मारून तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळण्याचा मोठा निर्णय घेतला. तो आज सार्थकी ठरला. १६ फेब्रुवारीला शेवटचा क्रीडा प्रकार खेळून ती अमरावतीला परीक्षा देणार आहे. राहिलेले विषयांची परिक्षा पुढील सत्रात देण्याचा धाडसी निर्णय तिने स्पर्धेपूर्वीच घेतला होता. या तिच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

मॉडर्न पेंटॅथलॉनमधील बायथले मिश्र रिले प्रकारात महाराष्ट्र सुरूवातीपासून आघाडीवर राहिला. सौरभ पाटील व दीप्ती काळमेघ जोडीने ही शर्यत १५.१६.८३ मिनिटांत पूर्ण करीत सुवर्ण यश खेचून आणले. मध्य प्रदेशला रौप्य, तर गुजरातला कांस्य पदक मिळाले. २०० मीटर जलतरण आणि १६०० मीटर धावणे प्रकाराच्या वैयक्तिक बायथले शर्यत दीप्तीने १६.३९.१० मिनिटांत पूर्ण करून दुसरे स्थान संपादन केले. मध्य प्रदेशच्या रमा सोनगरने सुवर्ण, तर उत्तराखंडच्या भार्गवी रावतने कांस्य पदक जिंकले.

पुरूषांच्या जलतरण स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारात पूर्ण कॉश्युम फाटल्याने सौरभला पदकापासून वंचित रहावे लागले. गत गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सौरभने १ सुवर्ण व १ रौप्य पदक जिंकले होते. २४ वर्षीय सौरभ पाटीलही याच क्लबमध्ये गेली ८ वर्षे सराव करीत आहे. सौरभचे वडील संजय पाटील शेतीसह पतसंस्थेत काम करतात. दीप्ती व सौरभ या दोघांनाही शेखर खासनीस हे विनामुल्य प्रशिक्षण देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *