
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय येथे ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र मार्फत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. या ग्रंथ प्रदर्शनानिमित्त १५ जानेवारीपर्यंत वाचन संकल्प पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.
आजच्या मोबाईलच्या व व्हाट्सअप मीडियाच्या युगात विद्यार्थी व वाचकांनी खरोखर ज्ञान मिळवण्यासाठी फॉरवर्ड केलेल्या व्हाट्सअप संदेशावर विसंबून न राहता खरोखर व विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी ग्रंथालयातील जास्तीत जास्त ग्रंथ वाचून स्वतः त्या माहितीची समीक्षा करून आपल्या ज्ञानात भर घालावी. विद्यार्थी व वाचक वर्ग ग्रंथालयाकडे आकर्षित व्हावा म्हणून वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांच्या हस्ते झाले. ७ जानेवारीला विद्यार्थ्यांमध्ये वाचनाबरोबर लिखाणामध्ये आवड निर्माण व्हावी त्यासाठी लेखक व विद्यार्थी यांच्यामध्ये खुले संवाद साधता यावा म्हणून लेखक व विद्यार्थी यांच्यामधील वाचन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १६ जानेवारीला ग्रंथ परीक्षण व कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी जीवनात समृद्धता व विकास करायचा असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात शिकत असताना वेळेचा सदुपयोग वाचनासाठी करावा, कारण वाचाल तर वाचाल! अशीच भूमिका आपणास घ्यावी लागेल. ग्रंथ हे जीवन जगण्यासाठी दिशा दाखवितात असे प्रतिपादन ग्रंथ प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी केले.
या पंधरवडा कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व वाचकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. एस. एन. डोंगरे यांनी केले आहे.
या पंधरवडा कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व वाचकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. एस. एन. डोंगरे यांनी केले आहे.