
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
गणेश माळवे
देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघाने चमकदार कामगिरी नोंदवत दोन्ही गटात रौप्यपदकाची कमाई केली.
टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महिला गटात महाराष्ट्र संघाला पश्चिम बंगाल संघाकडून ३-१ असा पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या एकेरी सामन्यात महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिला सुर्तिभा मुखर्जी हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मुखर्जी हिने ८-११, ११-६, १२-१४, ११-१३, ५-११ असा विजय नोंदवला. महाराष्ट्राची कर्णधार दिया चितळे हिने अहिका मुखर्जी हिचा १२-१०, ११-६, ११-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत सामन्यातील रोमांच वाढवला. तनिषा कोटेचा हिला पोयमाती बैस्या हिच्याकडून ८-११, ७-११, ११-६, ६-११ असा पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर अहिका मुखर्जी हिने स्वस्तिका घोष हिचा ८-११, ६-११, ११-१३ असा पराभव केला.
महाराष्ट्र महिला टेबल टेनिस संघात दिया चितळे (कर्णधार), स्वस्तिका घोष, तनिषा कोटेचा, सायली वाणी, रिथा टेनिसशन यांचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षक सुनील बाब्रास आणि संघ व्यवस्थापक गणेश माळवे यांचे मार्गदर्शन लाभले.
पुरुष गटात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात अंतिम सामना झाला. यात बंगाल संघाने महाराष्ट्र संघावर विजय नोंदवत सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
पहिल्या एकेरीत अर्बिन घोष याने जश मोदी याचा ७-११, १२-१०, ११-६, ६-११, ४-११ असा पराभव केला. दुसऱ्या एकेरीत अर्बिन घोष याने रेगन अल्बुकर्क याच्यावर ५-११, ८-११, १०-१२ असा विजय नोंदवला. सौरव शाह याने चिन्मय सोमय्या याचा ७-११, ८-११, ११-८, ८-११ असा पराभव करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
महाराष्ट्र पुरुष संघाने रौप्यपदक पटकावले. या संघात सिद्धेश पांडे (कर्णधार), जश मोदी, रेगन अल्बुकर्क, चिन्मय सोमय्या, दीपित पाटील यांचा समावेश आहे. या संघाचे प्रशिक्षक महेंद्र चिपळूणकर तर संघ व्यवस्थापक म्हणून श्रीराम कोनकर यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन पथक प्रमुख संजय शेटे, स्मिता शिरोळे, उपपथक प्रमुख सुनील पूर्णपात्रे यांनी महाराष्ट्र संघास भेट देऊन प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, सरचिटणीस नामदेव शिरगावकर, टेबल टेनिस राज्य अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, प्रकाश तुळपुळे यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.