पंचांचा चुकीचा निर्णय अंतिम मानायचा का ?

  • By admin
  • February 11, 2025
  • 0
  • 122 Views
Spread the love

  • दीपक अंकुश क्षीरसागर, एनएस-एनआयएस प्रशिक्षक (तलवारबाजी).

अहिल्यानगर येथे ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. ही स्पर्धा पंचांनी दिलेला चुकीचा निर्णय व खेळाडूने पंचांशी घातलेली हुज्जत या दोन मुद्यांवर खूप गाजली. त्याविषयी माझे वैयक्तिक मत मी मांडत आहे. कोणीही वैयक्तिकरित्या घेऊ नये. मी अनेक वर्षे हे ऐकत आलो आहे की पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असतो हे मलासुद्धा पटते. पण दिलेला निर्णय जर चुकीचा असेल, तर तो अंतिम मानायचा का? असे मला वाटते. कारण काही वेळा मला क्रीडा शिक्षक म्हणून काम करत असताना असा अनुभव आला आहे की काही पंच व स्पर्धा आयोजकांमध्ये काम करणारे सदस्य हे खेळाडू कितीही चांगला असला तरी चुकीचा निर्णय देवून त्या खेळाडूला स्पर्धेबाहेर काढतात. त्याने आयुष्यभर केलेल्या मेहनतीचा थोडासुद्धा विचार केला जात नाही. मग अशा पंचाचा अंतिम निर्णय मानावा का? खेळाडूंनी गैरवर्तन करू नये या मताचा मी आहे. पण पंच जर जाणीवपूर्वक चुकीचा निर्णय देत असतील व दाद मागूनसुद्धा निर्णय मिळत नसेल, तर खेळाडूने काय करावे? मग पंचाना केली गेलेली शिवीगाळ किंवा मारहाण या गोष्टीच्या समर्थनात मी अजिबात नाही. मात्र काही वेळेला पंच किंवा स्पर्धा आयोजन सदस्य किंवा त्या स्पर्धेचे पदाधिकारी हे जाणीवपूर्वक चुकीचा निर्णय देतात. यावर ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. कारण जिल्हास्तरापासून राष्ट्रीयस्तरांपर्यंत असेच सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे उत्तम दर्जाचे खेळाडू खेळापासून लांब होत आहेत.

ज्या खेळाडूंवर पंचाचा आशीर्वाद आहे त्या खेळाडूचा सहज विजयी होतो असे सध्या खेळाचे चित्र दिसत आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याने केलेल्या तक्रारीचा योग्य निकाल लावला असता तर पंच चुकीचा आहे की खेळाडू हे सर्व क्रीडाप्रेमींसमोर आले असते. व्हिडीओ पाहून निर्णय देता आला असता. मात्र असे झाले नाही. त्यामुळे शंका उपस्थित होते. व्हिडीओ पाहिल्यानंतर शिवराजचे दोन्ही खांदे मॅटला स्पर्श झालेले आढळून येत नाहीत आणि प्रतिस्पर्धी पैलवानाचा हात त्याच्या शरीराखाली असल्याचे व्हिडिओ आणि चित्रांत स्पष्ट जाणवते, मग कोणत्या तांत्रिक कारणांमुळे त्याचा पराभव झाला हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. नाहीतर अनेक खेळाडूंचा खेळावरचा विश्वास जो आधीच कमी झाला आहे. तो पूर्णता कमी होईल व राजकारणात जसे अनेक हुशार व्यक्ती राजकारणापासून लांब लांब पळतात. तसेच येत्या काही दिवसांत कोणताही पालक आपल्या मुलाला खेळामध्ये पाठवणार नाहीत. त्यामुळे योग्य न्याय मिळणे गरजेचे आहे. खेळाडू दोषी असल्यास जसे खेळाडूंच्या वर दंडात्मक कारवाई केली जाते. त्याच पद्धतीने जाणीवपूर्वक चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर दंडात्मक कारवाई केलीच पाहिजे या मताचा मी आहे. नाहीतर ज्या पद्धतीने शिवराजने आपल्या भावना व्यक्त केल्या व तो म्हणाला पंचांना त्यांच्या कर्माची फळे नक्की मिळतील. अशा आंधळ्या विश्वासावर प्रत्येक खेळाडूला हेच म्हणावं लागेल. मात्र न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत त्याचे भविष्य मात्र नक्कीच खराब होईल.

गेल्या वर्षी ऑलिम्पिकपटू फोगाट भगिनी यांनी लैंगिक शोषणाविरुद्ध केलेले आंदोलन आपण पाहिले. खेळाडूंना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागते ही सुद्धा खेळासाठी किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. हाही खेळातील राजकारणाचाच एक भाग आहे का? असा प्रश्न आमच्यासारख्या क्रीडाप्रेमींना पडतो आणि असे वाटते की खेळातील राजकारण संपलेच पाहिजे. देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करणारी मनू भाकर जेव्हा तिचे नाव पुरस्कार यादीमध्ये येत नाही त्यावेळेला तिच्या तोंडून मी उगाच खेळाडू बनले असे निघालेले उद्गार ऐकूसुद्धा वाटत नाहीत. खेळातील राजकारण इतके गढूळ झाले आहे की खेळाडूंचा विचार कोणीच करायला तयार नाही. प्रत्येकजण फक्त स्वार्थी विचार करून राजकारण करत आहे. खेळातले गढूळ झालेले राजकारण कधी स्वच्छ होणार आणि चांगल्या खेळाडूला प्रामाणिक पारदर्शक न्याय कधी मिळणार. यापेक्षा सर्वात वाईट वाटते ते म्हणजे न्याय मागायचा कुणाकडे हाच मोठा प्रश्न पडला आहे.

मी असे अनेक पंच पाहिले आहेत की ते स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक चांगल्या खेळाडूंचे नुकसान करतात. त्यांनासुद्धा मला असंच म्हणावं लागेल तुमच्या कर्माची फळे नक्कीच तुम्हाला मिळतील. फक्त त्या वेळेच्या प्रतीक्षेत सर्व प्रामाणिक खेळाडू असतील. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील या अंतिम निर्णयापूर्वी पंचांनी केवळ आपला तळहात पैलवानाच्या पाठीखाली घालून व्हेरिफिकेशन केले असते तरीही निर्णय सर्वांना झाला असता पण तसे घडले नाही. काही घाईने एकतर्फी निर्णय देऊन पंचानी पार्शिलिटी स्पष्ट केली आहे.

म्हणून मला म्हणावेसे वाटते की भविष्यात पंच चुकीचा निर्णय देणारच नाही अशा पद्धतीची ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. किंबहुना इतर काही खेळांमध्ये जसे सीनिअर रेफ्री असतात, पंचांच्या चुकीच्या निर्णयावर ते योग्य निर्णय घेतात तसा निर्णय कुस्ती खेळातही व्हायला हवा. किंवा थर्ड अंपायर म्हणून व्हिडिओ द्वारा पुनरावलोकन होऊनच अंतिम निर्णय व्हायला हवा. तरच खेळाडूंच्या मनात खेळ आणि पंच यांच्या विषयीचा आदरभाव आणि खात्री वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *