
पुणे : महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित व जागतिक बुद्धिबळ महासंघ, भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने होत असलेल्या ३७व्या नऊ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर खुल्या गटात आरित कपिलने ७.५ गुणांसह, तर मुलींच्या गटात राध्या मल्होत्रा, दिवी बिजेश, कियान्ना परिहार यांनी ७ गुणांसह संयुक्तरित्या आघाडी प्राप्त केली आहे.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात आठव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत दिल्लीच्या आरित कपिलने तेलंगणाच्या निधिश श्यामल याचा पराभव करून ७.५ गुणांसह आघाडी मिळवली. दुसऱ्या पटावरील कर्नाटकच्या अयान फुटाणे याने तामिळनाडूच्या लिशांत याला बरोबरीत रोखले व ७ गुण प्राप्त केले.
मुलींच्या गटात पंजाबच्या राध्या मल्होत्राने महाराष्ट्राच्या कार्तिक उतारा हिला बरोबरीत रोखले व ७ गुण प्राप्त केले. केरळच्या दिवी बिजेशने तामिळनाडूच्या मार्कसिम कार्की श्रीयुक्ताचा पराभव करून ७ गुणांची कमाई केली. राजस्थानच्या कियान्ना परिहार हिने दिल्लीच्या वंशिका रावत हिला नमवून ७ गुण मिळवले.